Hot Posts

6/recent/ticker-posts

Underground sewer | दाणादाण: पावसामुळे भूमिगत गटारींचे पितळ उघडे; सांडपाणी शिरले थेट घरात; भाजीमंडईचे झाले 'तळे'

         वैजापुरातील नागरिक संतापले 


वैजापूर: शहरासह परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास झालेल्या अवकळी पावसाने दाणादाण उडाली. सुमारे तासभर झालेल्या दमदार पावसामुळे भूमिगत गटारी ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले तर शहरातील येवला रस्त्यावरील भाजी मंडई पाण्याखाली जाऊन तिला 'तळ्याचे' स्वरूप प्राप्त झाले. पहिल्याच पावसात भूमिगत गटारींचे पितळ उघडे पडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.


गेल्या काही दिवसांपासून शहरात भूमिगत गटारींचे कामे सुरू आहेत. बहुतांश भागात कामे पूर्ण झाली तर काही भागात अजूनही कामे सुरू आहेत. मंगळवारी दुपारच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. 


शहरातील महाराणा प्रताप रस्ता परिसरातील भूमिगत गटार ओव्हरफ्लो झाल्याने हे पाणी संजय जेजुरकर यांच्या घरात शिरले. सांडपाणी घरात शिरल्याने त्यांच्यासह कुटुंबीयांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. गटारीचे सांडपाणी जलवाहिनीतून घरात शिरल्यामुळे ते पाणी बाहेर फेकता - फेकता कुटुंबातील सदस्यांच्या नाकीनऊ आले. या गलथान कारभारामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
 याशिवाय शहरातील बहुतांश भागातील भूमिगत गटारी ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये मोठी बोंबाबोंब झाली. पहिल्याच पावसात गटारींची ही अवस्था आहे. अजून पावसाळा सुरू झाला नाही. 


अवकाळी पावसातच गटारींचे पितळ उघडे पडले. त्यामुळे भर पावसाळ्यात गटारींची काय अवस्था होऊ शकते? याची कल्पना न केलेलीच बरी! एकीकडे गटारींच्या सांडपाण्याचा कहर तर दुसरीकडे शहरातील येवला रस्त्यावरील भाजी मंडईमध्येही मोठा चिथडा झाला. या अख्ख्या भाजी मंडईत पाणीच - पाणी होऊन तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
 परिणामी सायंकाळनंतर भाजी विक्रेत्यांना छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडावे लागले. भाजी मंडईचे तळे झाल्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. शहरातील डेपो रस्त्यावरही गटारी 'ओव्हरफ्लो' होऊन पाणी ओसंडून वाहत होते. पावसामुळे शहरातील बहुतांश भागात सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान गेल्या कित्येक दिवसांपासून भूमिगत गटारी ओव्हरफ्लो होत असताना पालिकेचे सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शहरात ठिकठिकाणी भूमिगत गटारी रस्त्यावरून वाहत आहेत. या गटारींची साफसफाई केली जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरवासियांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. अशी मागणी होत आहे.