Hot Posts

6/recent/ticker-posts

The water pipe burst | मोबाईल केबल गाडताना फुटली जलवाहिनी; वाहतुकीचा झाला खोळंबा

युद्धपातळीवर केले काम पूर्ण 


वैजापूर: एका मोबाईल कंपनीची भूमिगत केबल गाडण्यासाठी केलेल्या उपद्व्यापामुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची घटना घडली. परिणामी रस्त्यावर पाणी येऊन वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दुसरीकडे चौकातच दक्षिण बाजूला केबल गाडण्यासाठी खड्डा खोदून तसाच ठेवण्यात आला. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली होती.


शहरातून जाणाऱ्या नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असून या चौकातून एका मोबाईल कंपनीची भूमिगत केबल टाकण्यासाठी कटरच्या साह्याने प्रयत्न केला जात असताना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत कटर घुसून ती सोमवारी फुटली. परिणामी मुख्य चौकात पाणी साचून पाणीपुरवठा करण्यास अडथळा निर्माण झाला.


मंगळवारी पाऊस सुरू असल्यामुळे जलवाहिनीचे काम करता आले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच पालिका कर्मचाऱ्यांनी चौकात चोहोबाजूंनी बॅरिकेट्स उभे करून जलवाहिनीचे काम सुरू केले. साधारणतः दुपारी चार वाजेपर्यंत काम उरकण्यात आले. परंतु यामुळे वाहतुकीचे कोंडी होऊन सर्वांनाच नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
 दुसरीकडे नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील दक्षिण बाजूलाही गेल्या दोन दिवसांपासून केबल गाडण्यासाठी याच कंपनीच्या ठेकेदाराने खड्डा खोदून ठेवला होता. केबल गाडल्यानंतर खड्डा बुजविणे अपेक्षित होते. या महामार्गासह डेपो रस्त्यावरही वाहनांची मोठी वर्दळ असते.

 खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता बळावली होती. हा खड्डा दोन दिवस न बुजविता तसाच ठेवण्यात आला. बुधवारी दुपारनंतर तो खड्डा बुजविण्यात आला. दरम्यान मोबाईल कंपनीची भूमिगत केबल टाकण्यासाठी केलेल्या उपद्व्यापामुळे जलवाहिनी फुटून याचा नाहक त्रास पालिका कर्मचाऱ्यांसह वाहनचालकांना झाला.