सिडको,वाळूज, LCB पोलिसांची कारवाई
छत्रपती संभाजीनगर: पत्नीच्या विरहातून नशेच्या आहारी गेलेल्या सराईत चोरट्याचा अखेर सिडको पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल १५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून अन्य तीन दुचाकीचा तपास सुरु आहे. तर शहर आणि परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या अन्य चार चौघा चोरट्यांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तब्बल १६ दुचाकी आणि एक मोबाइल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सिडको, एमआयडीसी वाळूज आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
मोहम्मद हमीद अहेमद सिद्धीकी (४४, रा.जहागीरदार कंपाउंड, सादातनगर, रेल्वेस्टेशन), अजय विजय वाकडे (२२), कैफ रफीक शेख (२०, दोघेही रा. तोंडोळी, बिडकीन), आशिष रमेश गवई (२३) आणि मनोज सुखदेव शिंदे (२१, दोघेही रा. काचिपुरा झोपडपट्टी, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पडेगावातील साईनगरात राहणारे नितीन वाघ (२६) यांची दुचाकी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एमजीएम रुग्णालयासमोरुन चोरट्याने लंपास केली होती. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१४ दुचाकी चोरणारी 'ती' टोळी पकडली
कर्णपुरा यात्रेतून दुचाकी चोरी करून ती विक्रीसाठी आणणाऱ्या अजय विजय वाकडे (२२) आणि कैफ रफीक शेख (२०, दोघेही रा. तोंडोळी, बिडकीन) या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून १० लाख रुपये किमतीच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपी अजय वाकडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर या पुर्वी गुन्हे दाखल आहेत. या दुचाकीपैकी पाच दुचाकी आरोपीनी पैठण, छावणी, चिकलठाणा, सिडको आणि जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या आहेत.
मोबाईल, दुचाकी चोर जाळ्यात
एमआयडीसी वाळूज पोलिसांनी वेगवान कारवाई करत मोबाईल आणि दुचाकी हिसकावून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना काही तासांतच अटक केली. आशिष रमेश गवई (२३) आणि मनोज सुखदेव शिंदे (२१. दोघेही रा. काचिपुरा झोपडपट्टी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून ५५ हजारांचा मोबाईल आणि होंडा शाईन दुचाकी जप्त करण्यात आली.
Social Plugin