कृषी सहायकांचाही संप
वैजापूर: शासनाचे महाडीबीटी पोर्टल गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 'खोडा' बसला आहे. शेतकऱ्यांच्या मोबाईलवर विविध योजनेंतर्गत तुम्ही पात्र झाल्याचे संदेश येऊन धडकत असताना दुसरीकडे हे पोर्टलच बंद असल्यामुळे शेतकरी योजनेंचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत. एकीकडे पोर्टलचा खोडा तर दुसरीकडे कृषी सहायकांच्या संपामुळे लाभार्थी शेतकरी कचाट्यात सापडले असून याबाबत विचारणा कुणाला करायची? असा प्रश्न त्यांना सतावत आहे. दरम्यान सध्या या पोर्टलचे अद्ययावतीकरण (अपडेट ) सुरू असल्यामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोर्टल केव्हा सुरू होणार? याबाबत अनिश्चितता आहे.
शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. पाईपलाईनसह शेततळे, शेततळ्यांसाठी प्लास्टिक कागद व सिंचन सुविधांच्या योजनेवर अनुदान दिले जाते. या योजनांवर मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात असल्याने शेतकऱ्यांचा कल या योजनांकडे जास्त आहे. महाडीबीटी हे पोर्टल शेतकऱ्यांसाठी सरकारच्या विविध कृषी योजनांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी डिजिटल माध्यम आहे. या पोर्टलवर नोंदणी करून शेतकरी योजनांचा लाभ सहज घेऊ शकतात. शासकीय योजना अर्ज भरू शकता सवलतीच्या दराने यंत्रसामान मिळवू शकतात. सिंचन सुविधा व अनुदान मिळवू शकतात.
दरम्यान गेल्या दीड महिन्यापासून हे पोर्टल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत मंजूर योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या मोबाईलवर संदेश येऊन धडकले खरे. परंतु या पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी गेल्यास पोर्टल बंद असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय? कृषी सहायकांचाही संप सुरू आहे. त्यामुळे याबाबत कुणाला विचारणा करावी? असा प्रश्नही शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे.
दरम्यान कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सुरू केलेली सोडत पद्धत बंद करण्यात आली आहे. आता महाडीबीटीवर अर्ज करूनही निवड होत नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे. गत दीड महिन्यापासून महाडीबीटी पोर्टल अद्ययावतीकरणाच्या नावाखाली बंद असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. याबाबत तालुका स्तरावर विचारणा केल्यास निश्चित तारीख सांगता येणार नाही. अपडेटचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. चालू आर्थिक वर्षापासून प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, यापूर्वी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचाही विचार होणार आहे. परंतु, आता यापुढे सोडत पद्धत बंद करून प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यास प्राधान्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला योजना सुरू होताच महाडीबीटी पोर्टलवर अपडेट होऊन अर्ज दाखल करावा लागणार आहे. प्राधान्य क्रमाने मंजुरी मिळेल.
विविध कल्याणकारी योजनांचा लाभासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी या शासकीय पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, सध्या या पोर्टलवर तांत्रिक सुधारणा करण्याचे काम सुरू असल्यामुळे अर्ज प्रक्रिया काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी नव्याने अर्ज भरता येत नसल्याने अनेक शेतकरी संभ्रमात आहेत. त्यामुळे महाडीबीटी पोर्टल नेमके कधी व केव्हा चालू होणार? सध्यातरी हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
राज्यस्तरावरून तांत्रिक बदल
महाडीबीटी पोर्टलचे अद्ययावतीकरण सुरू असल्यामुळे शासनाने काही काळासाठी अर्ज प्रक्रिया थांबवली आहे. नवीन आर्थिक वर्षात महाडीबीटी पोर्टलमधील काही सुधारणांसाठी तसेच नव्या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना अधिक सुलभ सेवेसाठी पोर्टलमध्ये राज्यस्तरावरून काही तांत्रिक बदल केले जात आहेत. यामुळे काही काळासाठी अर्ज प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
Social Plugin