अंगावर वळ उमटेपर्यंत मारले
वैजापूर: वसतिगृहाच्या अधीक्षकासह मुख्याध्यापकाने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल आठ विद्यार्थ्यांना काठीने बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याच्या संशयातून ही घटना घडली असून या अमानुष मारहाणीच्या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या अंगावर वळ येईपर्यंत मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
येथील शासकीय वसतिगृहातील आठ सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर अधीक्षक जनार्दन गव्हाणे आणि शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी माळी यांनी ४ एप्रिल रोजी आठ विद्यार्थ्यांना आपल्या दालनात बोलावून घेत 'कॅमेरे तुम्हीच फोडले का?' असे विचारल्यानंतर कॅमेरे आम्ही फोडले नाहीत, असे सांगताच कॅमेरे आम्ही फोडले, असे कबूल करा, नसता तुम्हाला आम्ही मारहाण करू, अशी धमकी विद्यार्थ्यांना दिली; परंतु विद्यार्थी आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यानंतरही या दोघांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे एका विद्यार्थ्याने वैजापूर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान घटनेनंतर याच दिवशी संध्याकाळी विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून गव्हाणे आणि माळी या दोघांनी वसतिगृहात बोलावून घेतले. आपल्या मुलांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले असून त्याची नुकसान भरपाई म्हणून वीस हजार रुपये द्या. अशी मागणी केली होती. परंतु विद्यार्थ्यांच्या अंगावर मारहाणीचे वळ दिसून आल्याने पालकांनी नुकसानभरपाई देण्याचे नाकारले. याप्रकरणी एका मुलाच्या तक्रारीवरून गव्हाणे आणि माळी यांच्याविरोधात वैजापूर ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील शासकीय वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याची घटना घडली असून, हे कॅमेरे आठ विद्यार्थ्यांनीच फोडल्याचा आरोप करीत अधीक्षक गव्हाणे आणि माळी यांनी त्यांना मारहाण केली असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने दिली आहे. त्यानुसार सध्या दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय अधीक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. असे पोलिसांनी सांगितले.
येथील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी वसतिगृहातील आठ विद्यार्थ्यांनी आठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर आम्ही त्यांना फक्त जाब विचारला. मी त्यांना मारहाण केल्याचा जो आरोप पालक आणि विद्यार्थ्यांकडून केला जात आहे, तो धांदात खोटा असून त्यात काहीही तथ्य नाही. आम्हाला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी वसतिगृहातील २ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी केल्याची कारवाई केली आहे.असे वसतिगृहातील सूत्रांनी सांगितले.
वसतिगृह नेहमीच वादग्रस्त!
सामाजिक न्याय विभागाचे हे वसतिगृह या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत असून कायमच वादग्रस्त ठरलेले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या नाश्त्यासह जेवणात किडे आढळून आल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. याशिवाय निकृष्ट दर्जाचे जेवण हा नित्याचाच विषय आहे. त्यामुळे संबंधित वसतिगृहाच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
मारहाण समर्थनीय आहे का?
कॅमेरे फोडल्याच्या संशयातून ही घटना घडली. तोडफोडीची घटना समर्थनीय नाहीच. परंतु असे असले तरी विद्यार्थ्यांना एवढी अमानुषपणे मारहाण करण्याचा अधिकार अधीक्षक आणि मुख्याध्यापकाला कुणी दिला? अंगावर वळ उमटेपर्यंत झालेली मारहाण कशी समर्थनीय होऊ शकते? मारहाण करूनही शिरजोरपणे नुकसानभरपाई मागितली जाते. अशा मस्तवाल अधीक्षक व मुख्याध्यापकाविरुध्द कारवाई केली पाहिजे. अशी मागणी पालकांनी केली आहे.
Social Plugin