इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नागपूर : शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अख्खे पोलिस दल हादरले आहे. नागपुरातील एका आयपीएस अधिकाऱ्याच्याविरुद्ध डाॅक्टर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]() |
प्रतिकात्मक छायाचित्र |
दर्शन दुगड (३० रा. यवतमाळ) असे या आयपीएस (भारतीय पोलिस सेवा) अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत नागपूर येथील इमामवाडा पोलिस ठाण्यात एका डाॅक्टर तरुणीने या ३० वर्षीय आयपीएस अधिकाऱ्याच्या विरुद्ध लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.
पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी आणि डॉक्टर तरुणीची २०२२ मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. हा अधिकारी तेव्हा सिव्हिल सर्विसेसची तयारी करीत होता तर पीडित डॉक्टर तरुणी नागपुरात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती.
इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि भेटीगाठी वाढल्या. याचदरम्यान लग्नाचे आश्वासन देऊन तरुणाने वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप या डॉक्टर तरुणीने तिच्या तक्रारीत केला आहे. यानंतर मात्र तरुण सिव्हिल सर्विसेसची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी झाला आणि त्याने लग्नास नकार दिला.
अनेक वेळा प्रयत्न करूनही संबंधित आयपीएस अधिकारी भेटत नाही, त्याचे कुटुंबीय ही दाद देत नाही. यामुळे निराश झालेल्या डॉक्टर तरुणीने नागपूरच्या इमामवाडा पोलिस ठाण्यात आयपीएस अधिकाराच्या विरोधात आपल्यासोबत दुष्कर्म केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र तो नागपुरात कर्तव्यावर नसून नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेने पोलिस विश्वात एकच खळबळ उडाल आहे.
Social Plugin