Hot Posts

6/recent/ticker-posts

Leopard terror | नरभक्षक बिबट्या आणि रेस्क्यू पथक आमनेसामने आले अन्..; सर्वच थरारक!

भीती.. दहशत आणि सुटकेचा निःश्वास 


 वैजापूर: गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घालत दोन चिमुकल्यांसह एका वृद्धेचा बळी घेतला होता. यामुळे शेतवस्तीवरील शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली होती तर वनविभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता. अखेर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. बिबट्या व वनविभागाची यंत्रणा समोरासमोर असा थरार बुधवारी पाहायला मिळाला. अखेर तो नरभक्षक बिबट्या जाळ्यात अडकला अन यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला. 


वैजापूर तालुक्यातील डोंगरथळी भागात साधारणतः तीन महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता. बिबट्याने महेश सिध्दार्थ आखाडे (९, रा. मध्यप्रदेश) या परप्रांतीय मजुराच्या चिमुकल्यावर हल्ला करून ठार केले. ही घटना १५ जानेवारी रोजी तालुक्यातील कविटखेडा शिवारात घडली. तत्पूर्वी २९ डिसेंबर २०२४ रोजी श्रुती नामदेव आयनर (४) या चिमुकलीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. २९ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ऋतुजा सचिन कर्डक (३, रा. तांदुळवाडी ता. गंगापूर) हिच्यावर तालुक्यातील वळण शिवारात हल्ला करून ठार केले तर या घटनेच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजेच १ एप्रिल रोजी पहाटे प्रांतः विधीसाठी बाहेर पडलेल्या झुंबरबाई माणिक मांदडे (६५, रा. जिरी) यांच्यावरही बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना तालुक्यातील जिरी शिवारात घडली होती. 

या तीनही घटनेतील एक वैशिष्ट्य म्हणजे बिबट्याने दोन चिमुकले हल्ल्यात ठार केले. या सर्व घटना डोंगरथडी भागातच घडल्या. ऋतुजा कर्डक ही मामाकडे आलेली असताना बिबट्याने तिला भक्ष्य करून तिचा जीव घेतला तर महेश आखाडे हाही मजुरी करीत असलेल्या आईवडिलांसोबत होता. शेतात खेळत असताना बिबट्याने त्याला ऊसाच्या शेतात नेऊन त्याचा बळी घेतला. यापेक्षाही भयावह स्थिती ऋतुजा व झुंबरवाई यांच्या मृतदेहाची झालेली होती. मान आणि तोंडाचे बिबट्याने लचके तोडून ठार केले होते. 

डिसेंबर अखेरपासून आतापर्यंत सातत्याने हल्ल्याचा घटना घडत असताना संबंधित यंत्रणा काय करीत होती? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच होते. परंतु असे असले तरी जिरीच्या घटनेनंतर वनविभाग खडबडून जागा झाला आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अख्खी यंत्रणा कामाला लागली. गेल्या दोन दिवसांपासून वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया भिसे यांच्यासह कर्मचारी जिरी शिवारात ठाण मांडून बसले होते.

 बिबट्याला पकडण्यासाठी ड्रोन कॅमे-यासह ट्रॅप कॅमेरे, पिंजरा व जाळे पसरून ठेवले होते. अखेर बिबट्या वनविभागाच्या हाती लागला. दरम्यान जिरीत झुंबरबाई मांदळे यांच्यावर हल्ला केल्यानंतर वनविभाग खऱ्या अर्थाने कामाला लागला. ज्या ठिकाणी कॅमेरे लावलेले होते. त्यामध्ये बिबट्या तीनवेळा दिसून आला. त्यामुळे बिबट्‌याचा दोन दिवसांपासून वावर याच परिसरात होता. ही बाब अधोरेखित होते.

आमदारांची समजूत अन् अंत्यसंस्कार

दरम्यान, घटनेनंतर झुंबरबाईवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी विरोध केला होता. जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही. असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. परंतु आमदार रमेश बोरनारे यांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर त्यांच्यावर दुपारी ४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बिबट्या कॅमेऱ्यात कैद!

साधारणतः दुपारी तीन वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया भिसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्या सध्याही आमच्यासमोर असल्याचे सांगितले. बिबट्या लवकरच जेरबंद होईल. असा विश्वास प्रिया भिसे यांनी व्यक्त केला होता.

बिबट्याला पकडण्यासाठी आमची यंत्रणा संपूर्ण ताकदीनिशी गेल्या दोन दिवसांपासून घटनास्थळी तळ ठोकून होती. त्याला जेरबंद करण्यासाठी डोन कॅमे-यासह ट्रॅप कॅमेरे, जाळे व पिंजरा लावण्यात आले होते. २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास बिबट्या व आम्ही समोरासमोर होतो. तो प्रसंग खूपच थरारक होता.

- प्रिया भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वैजापूर