पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी
वैजापूर: नगरपालिका प्रशासन स्वच्छतेसह सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्याने आता शहरातील स्वच्छता मोहीम हाती घेण्यासाठी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. दरम्यान राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही मोहीम हाती घेऊन पालिका प्रशासनाला सणसणीत चपराक दिली आहे. शिवसेना आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी ९ एप्रिल रोजी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा नारा दिला आहे. नेत्यांच्या या 'गांधीगिरी'मुळे पालिका आतातरी 'ठिकाणा'वर येईल का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
शहरात स्वच्छतेचे 'धिंडवडे' निघाले असून भूमिगत गटारी 'ओव्हरफ्लो' होऊन ओसंडून वाहत आहे. याशिवाय खुल्या गटारींचीही महिनोन्महिने साफसफाई होत नाही. केरकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने शहराच्या चोहोबाजूंनी प्रमुख मार्गावर कचऱ्यांचे ढिगारे साचले आहेत. शहरातील प्रमुख ठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे आहेच. गल्लोगल्ली घंटागाड्यांचे सायरनही आता वाजेनासे झाले आहे.
पालिकेचे प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ढेपाळले असून 'वादग्रस्त' अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहराच्या स्वच्छतेसह कामकाजाला 'ग्रहण' लागले आहे. पालिका प्रशासन स्वच्छतेसह विविध आघाड्यांवर अपयशी ठरल्याने शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare) यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात 'झाडू' घेऊन पालिकेच्या विरोधात 'गांधीगिरी' करण्याचा निर्णय घेतला अन् तो अंमलातही आणला.
पालिकेच्या गलथान कारभाराच्या विरोधात माजी नगराध्यक्षांसह माजी नगरसेवकांनी तक्रारींचा पाऊस पाडलेला असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून केवळ कागदी घोडे नाचविण्यापलिकडे काहीच झालेले नाही. डिसेंबर महिन्यापासून सातत्याने पालिका प्रशासनाच्या विरोधात तक्रारी सुरू असताना जिल्हा प्रशासन केवळ हातावर हात ठेवून आहेत. अशा परिस्थितीत शहरातील स्वच्छतेसाठी लोकप्रतिनिधींनाच हातात झाडू घेण्याची वेळ येत असेल तर धिक्कार आहे पालिका प्रशासनाचा.
केवळ स्वच्छतेसाठी एवढा आटापिटा करावा लागत असेल अन्य नागरीसुविधांची काय परिस्थिती असेल? याची कल्पनाच न केलेली बरी! शहरासह आजूबाजूला कचऱ्यांचे ढिगारे झाल्याने वैजापूर शहर आता 'कचऱ्यांचे' शहर म्हणून ओळखले जात आहे. पालिका प्रशासन स्वच्छतेबाबत असमर्थ ठरत असल्याने नाकावर 'टिच्चून' शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा आमदार रमेश बोरनारे यांनीच हातात 'झाडू' घेऊन पालिका अधिकाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे.
त्यांच्यासमवेत माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी सभापती बाबासाहेब जगताप, साबेरखान, संजय बोरनारे, डॉ. राजीव डोंगरे, राजेंद्र साळुंके, नारायण कवडे, पारस घाटे, रणजीत चव्हाण, अमोल बोरनारे, बाळासाहेब जाधव, सुलभा भोपळे आदींसह पदाधिकारी, महिला व कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन शहरातील शिवराई रस्ता, गंगापूर रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, जुनी भाजीमंडई आदी परिसर स्वच्छ केला. चक्क आमदार बोरनारेंनीच हातात झाडू घेतल्यामुळे पालिका प्रशासन खजिल झाले अन् दिमतीला यंत्रणा ठेवली. हेही नसे थोडके!
Social Plugin