Hot Posts

6/recent/ticker-posts

MLA Ramesh Bornare | आमदारांची दिल्ली वारी अन् मंत्र्यांना साकडे! मतदारसंघासाठी काय मागितलं?


केंद्रीय रस्ते वाहतूक, कृषी, रेल्वेमंत्र्यांची भेट 


वैजापूर: शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये मतदारसंघातील विकासकामांसाठी तीन हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणला. बोरनारेंनी आता आपला मोर्चा दिल्लीश्वरांकडे वळविला असून या वारीत त्यांनी मग्रारोहयोच्या कामांच्या थकित निधींसह नाबार्डतर्गंत रस्त्यांच्या कामांसाठी निधी व रेल्वेप्रश्नांबात संबधित‌ केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन साकडे घातले. विशेषतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीत मतदारसंघातील रस्त्यांच्या जाळ्याबाबत चर्चा केली. या प्रश्नावर गडकरींनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्य महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची आमदार रमेश बोरनारे यांनी दिल्ली येथ  नाबार्ड अंतर्गत काही रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील राहील व लवकरच रस्त्यांच्या कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांचा दर्जात वाढ व्हावी, जिल्हा परिषद गट, तालुका सरहद्द व महत्वपूर्ण महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर नवीन राष्ट्रीय महामार्ग आणि विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून मतदारसंघातील प्रलंबित असलेले महत्वाकांक्षी रस्त्यांसाठी निधी देण्याची मागणी बोरनारेंनी केली. 

याशिवाय केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही आमदार बोरनारे यांनी दिल्लीत भेट घेऊन वैजापूरनजीकच्या रोटेगाव रेल्वेस्टेशन येथून छत्रपती संभाजीनगर येथे अंदाजे दोन ते तीन हजार विद्यार्थी, कामगार, नोकरदार व उद्योजक प्रवास करतात. रोटेगाव येथून जाणार्‍या सर्व गाड्यांना थांबा मिळत नसल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या सर्व जाणाऱ्या गाड्यांना थांबा मिळावा याबाबत चर्चा करून बोरनारेंनी मंत्र्यांना निवेदन दिले. केंद्रीय कृषी, ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांचीही भेट घेऊन महाराष्ट्र ग्रामीण  रोजगार हमी योजनेतून चालू असलेल्या कामांना निधी उपलब्ध नसल्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याप्रसंगी खासदार श्री डॉ. श्रीकांत शिंदे,  संदीपान भुमरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप उपस्थित होते.

दरम्यान गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातर्गत रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विणले गेले असले तरी जिल्हा परिषद गटांसह दोन तालुक्यांना जोडणाऱ्या मार्गासह प्रमुख जिल्हा मार्गाला जोडणाऱ्या मार्गांची अजूनही कमी आहे. त्यामुळे हे रस्त्यांचे जाळे विणले गेल्यास दळणवळण नागरिकांना आणखी सुसह्य होईल. याशिवाय रोटेगाव रेल्वेस्थानकावर सचखंड एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस यासह बहुतांश गाड्यांना थांबा दिला जात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून वैजापूरकरांची ही मागणी आहे. परंतु या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.  दरम्यान आमदार बोरनारेंनी संबंधित मंत्र्यांना साकडे घातल्याने मग्रारोहयोसह रेल्वे व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.

मग्रारोहयो देयकांसह कामांनाही 'ब्रेक'

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात बहुतांश कामे झालेली असतानाही त्यांची देयके मिळायला तयार नाही. त्यामुळे देयकांसह कामांनाही ब्रेक मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांत मग्रारोहयोची १६ हजार कामे प्रलंबित असून कोट्यवधी रुपयांची देयके थकली आहेत.  मग्रारोहयो आयुक्तांनी ( नागपूर) देयकांसह नवीन कामांना मंजुरी देण्यासाठी ब्रेक लावला आहे.

थांबा न देण्याचे काय आहे कारण?

दरम्यान रोटेगाव हे छोटे गाव असून मॅप व लोकसंख्येच्या दृष्टीने लहान आहे. त्यामुळे रेल्वे ही लोकसंख्या गृहीत धरून त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. वास्तविक पाहता रोटेगाव छोटे असले तरी वैजापूर शहर हे लगत आहे. हे रेल्वे ग्राह्य धरायला तयार नाही. त्यामुळे रेल्वे या प्रश्नावर गंभीर नाही. हे एक कारण समोर आले आहे. वैजापूर शहराच्या लोकसंख्या व जाणाऱ्या प्रवाशांचा विचार केल्यास या स्थानकावर गाड्यांना थांबा देण्यास काहीच हरकत नाही. परंतु 'आले रेल्वेच्या मना, तिथे कुणाचे चालेना' अशी परिस्थिती झाली आहे.