कन्नड तालुक्यातील दुर्देवी घटना
कन्नड: कन्नड - पिशोर रस्त्यावर (Kannad-Pishor Road Sugarcane Truck Accident) खांडीतील वळणावर ऊसाने भरलेला ट्रक पलटी झाल्याने ऊसाखाली दबून सहा ऊसतोड कामगारांचा (Sugarcane Worker) दुर्देवी मृत्यू झाला तर सातजण जखमी झाले आहे. ही घटना रविवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजेदरम्यान घडली. मयत हे एकाच गावातील असल्याने अख्खे गाव शोकसागरात बुडाले आहे.
रसवंतीसाठी मजुरांनी ऊसतोड करून रात्री ट्रक (क्रमांक जीजे १० टीव्ही ८३८६) मध्ये ऊस भरला. घरी परतण्यासाठी वाहन नसल्याने सर्व ऊसतोड मजुर ट्रकच्या केबिनसह वर बसले. ट्रक कन्नडकडे येत असतांना गौताळा अभयारण्यातील चंदन नाल्यापासून पिशोरकडे सुमारे पाचशे फुटावर असलेल्या वळणावर ट्रक उलटला. ट्रक उलटल्याने केबिनवर बसलेले ऊसतोड मजुर रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत फेकून त्यांच्या अंगावर ऊस पडल्याने ते ऊसाखाली दबले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोनि रघुनाथ सानप , सपोनि कुणाल सुर्यवंशी, पोउपनि त्रिलोकचंद पवार, प्रविण बर्डे, पोशि विजय चौधरी, नामदेव धोडकर यांनी घटनास्थळी धाव घेवून नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करून ऊसाखाली दबलेल्या ऊसतोड मजुरांना बाहेर काढले व सर्वांना कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले.
त्यापैकी किसन राठोड, मनोज चव्हाण, मिथुन चव्हाण व कृष्णा राठोड यांना वैद्यकीय अधिकाऱ्याने डॉ रुपाली पटारे, डॉ शाहेद पटेल मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेले विनोद चव्हाण व ज्ञानेश्वर चव्हाण यांना पुढील उपचारासाठी घाटी दवाखान्यात रवाना केले. तथापि तिथे त्यांचा मृत्यू झाला तर सात जणांवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान अपघातातील मृत एकाच गावातील असल्याने त्यांच्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे अख्खा गावावर शोककळा पसरली आहे.
वाढदिवस सोडून गेले मदतीला
राहुल वाघ, गौरव गजभार, रवींद्र दारुणकर, संतोष पवार,नौशाद पटेल,अनीस शेख, शाहिद शेख, ओम जाधव ,निलेश खंडागळे, रोहन डोंगरे हे शहरातील पिशोर नाका येथे मित्राचा वाढदिवस साजरा करीत असतांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पोलिसांसमवेत मदतकार्य केले.
मृतांची नावे अशी:
किसन धन्नू राठोड ( ३२ ), मनोज नामदेव चव्हाण ( २३ ), विनोद नामदेव चव्हाण ( २६), मिथुन महारू चव्हाण ( २६ ), कृष्णा मुलचंद राठोड ( ३०) सर्व रा. सातकुंड व ज्ञानेश्वर देविदास चव्हाण ( ३०) रा. बेलखेडा ह. मु. सातकुंड ता. कन्नड
जखमींची नावे अशी:
इंदलचंद प्रेमचंद चव्हाण (३१ )., लखन छगन राठोड (२९ ), सचिन भागीनाथ राठोड ( २२ ), राहुल नामदेव चव्हाण ( १९) रविंद्र नामदेव राठोड (२५), सागर भागीनाथ राठोड (२५) सर्व रा. सातकुंड, इस्माईल अब्दुल जेडा (२५) व उमर मुसा जेडा ( ६० ) रा. जेडा ( गुजरात )
Social Plugin