खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी
वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिस ठाण्यात दाखल खोटा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी एकाने अंगावर डिझेल घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केल्याची (Attempted to end life by pouring diesel on the body) खळबळजनक घटना १० मार्च रोजी दुपारच्या सुमारास येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात (Sub-divisional Office) घडली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून आवर घातल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात धाव घेऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकाकडून डिझेलच्या बाटल्या हस्तगत केल्या. या घटनेमुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांचीचांगलीच धांदल उडाली.
किरण भागीनाथ पवार रा. पिंपळगाव खंडाळा असे जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, किरण पवार यांच्या वडिलांचा मारहाणीत काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
या पूर्ववैमनस्यातून फेब्रुवारी महिन्यात किरण पवार यांच्याविरोधात देखील शिऊर पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या गुन्ह्यात आपण नव्हतो व आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे किरण पवार यांचे म्हणणे असून 'तो' गुन्हा रद्द करा या मागणीसाठी त्यांनी शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी निवेदन दिले. गुन्हा रद्द करण्यासाठी मी संबंधितांकडे वेळोवेळी मागणी केली. परंतु आपल्या मागणीची कुणीही दखल घेत नसल्याने आपण उपविभागीय कार्यालयात जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला असल्याचे पवार यांचे म्हणणे आहे.
याशिवाय वडिलांच्या मृत्यूनंतर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्या घटनेतील साक्षीदाराचे नाव बाहेर पडलेच कसे ? असा देखील प्रश्न यावेळी पवार यांनी उपस्थित केला. ते अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न करीत असताना उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी पवार यांना पकडून त्यांच्याकडून डिझेलची बाटली हिसकावून घेतली. या घटनेची वार्ता पोलिसांना समजताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पवार यांच्या सोबत असलेल्या महिलेकडून डिझेल जप्त केले.
ठाण्यातील कर्मचारीच 'भेदी'
किरण पवार यांच्या वडीलांच्या मृत्यू प्रकरणात शिऊर पोलिसांनी साक्ष नोंदवली. ही कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यापूर्वीच विरोधकांना कुणकुण लागून त्यांनी साक्षीदारांना मारहाण केल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. न्यायालयात कागदपत्रे दाखल करण्यापूर्वी साक्षीदारांची माहिती विरोधकांपर्यत जातेच कशी? याचाच अर्थ शिऊर पोलिस ठाण्यातील कुणीतरी 'भेदी' विरोधकांना मिळालेला आहे. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षकांनीही यात चिरीमिरी घेऊन माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.
फिल्डींग एकीकडे अन् घटना दुसरीकडे!
दरम्यान किरण पवार हे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न करणार असल्याची भणक पोलिसांना भणक लागली. त्यामुळे त्यांनी कार्यालयात फिल्डींग लावून ठेवली होती. परंतु तिकडे पोलिसांनी फिल्डींग लाललेली असतानाच इकडे उपविभागीय अधिकारी कार्यालयात पवार यांनी अंगावर डिझेल ओतून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला तरी पोलिसांना भणक नाही. सर्व सारवासारव झाल्यानंतर पोलिस कार्यालयात येऊन पोहोचले.
किरण पवार याच्याविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल असून त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्याचा अधिकार आम्हाला नाही.
- वैभव रणखांब,सहायक पोलिस निरीक्षक, शिऊर
Social Plugin