Hot Posts

6/recent/ticker-posts

Teenagers drowned | 'ते' चौघेजण पोहायला गेले अन् दोघेजण..; नेमकं काय घडलं?

तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू


लासूरस्टेशन: लासूर स्टेशन जवळील वैरागड (ता. गंगापूर) शिवारात असलेल्या पाझर तलावात दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.



 गौरव प्रकाश शेजवळ (१६) व अभिषेक सोमनाथ वाघचौरे (१६) अशी मृतांची नावे आहेत. वैरागड शिवारात घडलेल्या या घटनेची माहिती अशी की, वैरागडची चार शाळकरी मुले पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेली होती. यातील गौरव शेजवळ व अभिषेक वाघचौरे हे दोघे तलावात पोहण्यासाठी उतरले असता दोघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही व दोघेही बुडून तलावातील गाळात फसले.

मित्रांनी केली धावाधाव

दरम्यान तलावाच्या काठावर असलेल्या दोघा मित्रांना हे दोघे पाण्यातून वर येईना तेव्हाच त्यांनी आरडाओरडा केला. तसेच मोबाईलवरून जवळच्या नागरिकांना घटनेची माहिती दिली. परंतु नागरिक मदतीला येईपर्यंत उशीर झाला होता. अखेर गावकऱ्यांनी तलावातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. परिसरात याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गौरवने दिली होती दहावीची परीक्षा

गौरव याने नुकताच दहावीचा पेपर दिला होता. तसेच आईवडिलांना गौरव एकुलता एक मुलगा होता तर अभिषेकने आठवीलाच शाळा सोडली होती. परंतु उन्हाळ्यात मित्र पोहायला निघाले तेव्हा अभिषेकही सोबत गेला होता.