Hot Posts

6/recent/ticker-posts

Action against sand smugglers | पोलिसांचे ११ ठिकाणी छापे, १.२८ कोटींचा मुद्देमाल जप्त, २८ वाळूमाफियांविरुद्ध गुन्हे दाखल; कुठे झाली कारवाई?

माफियांच्या आवळल्या मुसक्या!


अहिल्यानगरः गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफियांनी उच्छाद मांडला असून गोदापात्रात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील वाळूमाफियांविरुद्ध विशेष मोहिम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत या पथकाने एकूण ११ ठिकाणी छापे टाकून २८ जणांविरुद्ध  गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी या कारवाईत सुमारे १ कोटी २८ लाख रुपये किंमतीचे वाळूसाठे व वाहने जप्त केली आहे. जिल्ह्याच्या गोदावरी नदीपात्रात ही मोहीम राबविण्यात आली.



जिल्ह्यातील श्रीरामपूर, शेवगाव, नेवासा, कोपरगाव, राहता व पारनेर  या तालुक्यांमध्ये पोलिसांनी ही मोहीम राबवली. त्यासाठी पोलिसांची विविध पथके गठित करण्यात आली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली  अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संदीप दरंदले, बीरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, रोहित येमूल, भाऊसाहेब कांबळे, अमोल कोतकर, विशाल तनपुरे, रमीजराजा आत्तार, अशोक लिपाणे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, मिरजगाव, पारनेर, नेवासा येथे सात ठिकाणी छापे टाकून १३ जणांविरुद्ध  गुन्हे दाखल केले आहेत. 

पोलिसांनी त्यांच्याकडून वाळूसाठे व वाहने असा ८८ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याशिवाय श्रीरामपूर व शेवगाव तालुक्यातील वाळूमाफियांवर कारवाई करीत १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये ४० लाख २० हजार रुपये किमतींचे वाळूसाठे व वाहने जप्त केली आहे. दरम्यान या मोहिमेत  नदीपात्रात अनेक ठिकाणी बेकायदेशीर वाळूउपसा करतानाच माफियांन्या मुसक्या आवळण्यात आल्या. श्रीरामपूर तालुक्यातच ४० लाखाचे वाळू साठे व वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे माफियांचे धाबे दणाणले आहेत.