दानवेंना शह देण्यासाठी भाजपची खेळी
छत्रपती संभाजीनगर: भाजपच्या वाट्याला विधान परिषदेच्या तीन जागा आल्या अन त्यातील एक जागा मराठवाड्याच्या पदरात भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर Maharashtra MLC Election BJP Candidate Sanjay Kenekar) यांच्या रुपाने जाहीर केली गेली.
सामान्य कार्यकर्ता आमदार होऊ शकतो. असा चमत्कार भाजप मध्येच होऊ शकतो. असे मत संजय केणेकर यांनी व्यक्त करीत मुंबई गाठली. पक्ष आदेशानुसार सोमवारी उमेदवारी दाखल करण्यासाठी केणेकर यांनी चालून आलेला संकष्टीचा मुहूर्त साधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे आणि भाजपमध्ये ३५ वर्षे पक्षनिष्ठेचे फळ केणेकरांना मिळाले असल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकीत मिळेल बळ!
सध्या भाजपने महापालिकेची जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुतीत लढण्याऐवजी भाजपने 'एकला चलो रे'चा नारा दिल्याने संघटनात्मक फळी आणखी मजबूत करण्याकडे भाजप लक्ष देत आहे. दुसरीकडे महायुतीचे कट्टर विरोधक उबाठाचे अंबादास दानवे यांना टक्कर देण्यासाठीही केणेकर यांच्या रूपाने ताकदवान आमदार मिळणार असल्याने महापालिकेसाठी कडवट टक्कर होण्याची शक्यता आहे.
गेल्या वेळी हुकली संधी
गेल्या वेळी राजीव सातव यांचं निधनानंतर संजय केणेकर यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली होती. मात्र काँग्रेसने राजीव सातव यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने भाजपने केणेकर यांना उमेदवारी मागे घेत पक्षादेश पाळला होता.
विवाहासाठी सीएमची होती उपस्थिती
केणेकर हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात. केणेकर यांच्या चिरंजीवांच्या विवाहाच्या स्वागत समारंभ ६ डिसेंबर रोजी झाला होता. नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीष महाजन, मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. प्रवीण दरेकर, आ. नारायण कूचे, पालकमंत्री संजय शिरसाठ, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांची प्रमुख हजेरी होती हे विशेष.
राजकीय प्रवास
■ केणेकर यांचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिलेला आहे. त्यांचे शिक्षण बी. कॉम. झालेले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत एक वर्ष काम करण्याची संधी मिळाली. भाजपाचे युवा मोर्चामध्ये वार्ड अध्यक्ष ते प्रदेश उपाध्यक्ष जवळपास १२ वर्षे ते कार्यरत होते. नगरसेवक म्हणून तीनदा निवडून आले.
■ वयाच्या २३व्या वर्षी उपमहापौरपदी ते विराजमान झाले. महापालिकेत गटनेते म्हणून त्यांनी काम केले. २००८ साली नितीन गडकरी यांनी स्थापन केलेल्या भाजप कामगार आघाडीचे ते अध्यक्षही राहिले. याच संघटनेत २००८ ते २०१० पर्यंत प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे याच संघटनेत प्रदेश अध्यक्ष म्हणून ६ वर्षे (दोन टर्म) कार्यरत राहिले.
■ भाजपच्या शहर जिल्हा अध्यक्ष म्हणूनहे ते कार्यरत होते. कोरोनाच्या कठीण काळात सरकारच्या विरोधात त्यांनी आक्रमकपणे आंदोलने केली. यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मानही केला होता. सध्या ते भाजप प्रदेश सरचिटणीस (महामंत्री) म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय म्हाडाचे सभापतिपद यासह इतर संघटनात्मक जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या. दिल्लीपर्यंत त्यांचा विशेष संपर्क असल्याचे बोलले जाते. परिणामी आता त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.
Social Plugin