उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश
वैजापूर: ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी उबाठा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिंदेसेनेच्या गोटात जाऊन मिळाले होते. परंतु काही दिवस 'विश्रांती' घेत त्यांनी आता शिंदेसेनेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या १८ मार्च रोजी चिकटगावकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांचा प्रवेश होणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी वैजापूर तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले होते. भाजपचे डॉ. दिनेश परदेशी उबाठा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची आवई उठल्यानंतर चिकटगावकर 'अलर्ट' होऊन त्यांनी पक्षनेत्यांशी 'अबोला' धरून पक्षीय कार्यक्रमास 'दांडी' मारणे सुरू केले. त्यानंतर काही दिवसांनी झालेही तसेच. डॉ. परदेशींच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब होताच चिकटगावकरांनी उबाठाला जय महाराष्ट्र केला.
त्यानंतर विधानसभा निवडणुकीत चिकटगावकरांनी शिंदेहसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या तंबूत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान विधानसभा निवडणुकीत त्यांनी बोरनारेंसोबत काम केले. गेल्या काही दिवसांपासून ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दिसत असले तरी राजकारणात फारशी सक्रियता नव्हती. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांचा १८ मार्च रोजी दुपारी मुंबई येथे समर्थक कार्यकर्त्यांसह प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमास आमदार रमेश बोरनारे हेही उपस्थित राहणार आहेत. आगामी काळात बोरनारे-चिकटगावकरांचे 'तुझ्या गळा.. माझ्या गळा, गुंफू सत्तेच्या माळा' राजकारण पहावयास मिळणार आहे.
Social Plugin