कृषीपंपांना सोलरच्या माध्यमातून वीजपुरवठा
मुंबई: बळीराजा मोफत वीज योजनेच्या (Baliraja Yojana) माध्यमातून ४५ लाख कृषिपंपांना मोफत वीज देण्यात येते. या माध्यमातून १६ हजार मेगावॅट वीज देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. या फीडरचेही पूर्ण सोलरायझेशन करण्यात येत असून डिसेंबर २०२६ पर्यंत कृषिपंपांना शंभर टक्के वीज सोलरच्या माध्यमातून दिली जाईल. तसेच १०० युनिट पर्यंत वीज वापरणारे राज्यात ७० टक्के म्हणजे दीड कोटी ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी देखील सोलर योजना (Solar panel System ) आणत आहोत. त्यामुळे या दीड कोटी वीजग्राहकांची देखील वीजबिलातून मुक्तता होणार आहे. दरवर्षी वीजेचे दर ९ टक्क्यांनी वाढत असतात. मात्र यावेळी पहिल्यांदाच त्यात घट होणार आहे. १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना २४ टक्क्यांची तर १०० ते ३०० युनिट वापरकर्त्यांना १७ टक्क्यांची वीजबील घट येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केली. लवकरच वीज कंपनी स्टॉक मार्केटमध्ये देखील लिस्टेड होणार असल्याचेही ते म्हणाले.
सौरघरांचीही बिलातून सुटका!
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायची असेल तर मोठया प्रमाणात वीजेची गरज आहे. महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपिटल बनणार आहे. त्यासाठी सर्व ती तयारी करण्यात आलीआहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून २० लाख घरे देण्यात येणार आहेत. ही सर्व घरे सोलर पॅनेलने युक्त असतील.
त्यामुळे या वीस लाख घरांना देखील वीजबिलातून मुक्तता मिळणार आहे. शेतकऱ्यांना देखील वर्षाचे ३६५ दिवस तेही दिवसा वीज मिळणार आहे. एकूण वीज खरेदीत सरकारची १० हजार कोटींची बचत होणार असून कार्बन उत्सर्जनात २५ टक्क्यांची कपात होणार आहे. २०३० सालापर्यंत ५२ टक्के वीज ही अपारंपरिक उर्जा स्त्रोतातून निर्मित करण्यात येणार आहे.
Social Plugin