खंबाळ्यातून सव्वालाखाचा ऐवज लंपास
चोरट्यांनी घरफोडी करून सव्वा लाखांचा ऐवज चोरी करून नेल्याची घटना वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथे ०८ मार्च रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र नामदेव खंडागळे हे तालुक्यातील खंबाळा येथे शेती व्यवसाय करून उपजीविका भागवितात. या ठिकाणी ते कुटुंबासह रहिवासास आहेत. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता त्यांनी व कुटुंबातील इतर सदस्यांनी नेहमीप्रमाणे जेवण आटोपून घराच्या हॉलमध्ये झोपी गेले.
शनिवारी पहाटे साडेपाच वाजता जितेंद्र यांना झोपेतून जाग आली. यावेळी त्यांनी बेडरूममध्ये जाऊन बघितले असता तेथील एक लोखंडी व लाकडी कपाटाचे दरवाजे त्यांना खुले दिसले व त्यातील साहित्य अस्तव्यस्त झालेले दिसले. यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला झोपेतून जागे केले.
दोघा पती-पत्नीने बेडरूममध्ये जाऊन बघितले असता त्यांच्या पत्नीने कपाटात ठेवलेले ७० हजारांची रोकड व ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख २० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी जितेंद्र खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin