अवैधधंदे मोडीत काढण्याचे आव्हान
वैजापूर : जिल्ह्यातील पोलिस दलातील अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यात आली आहे . वैजापूर पोलिस ठाणेप्रमुखांचीही बदली झाल्याने त्यांच्या जागेवर नूतन पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांची वर्णी लागली असून रविवारी त्यांनी पदभार स्वीकारला आहे. दरम्यान शहर व हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैधधंदे फोफावले आहे. त्यामुळे हे अवैधधंदे मोडीत काढण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी पदभार स्वीकारला आहे. शहरातील नागरिकांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी नूतन ठाणेप्रमुखांचे स्वागत तर मावळत्या ठाणेप्रमुखांचा सत्कार करून निरोप दिला.
साधारणतः दोन वर्षांपासून कौठाळे येथे कार्यरत होते. ताईतवाले यांनी यापूर्वी शिऊर पोलिस ठाणेप्रमुख म्हणून साधारणतः तीन वर्षे काम बघितलेले आहे. त्यामुळे त्यांना जवळपास अर्धा तालुका परिचित आहे. याशिवाय त्यांनी गंगापूर ठाणेप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. 'दबंग' अधिकारी म्हणून त्यांचा ठसा उमटलेला आहे. शिऊरमध्ये असताना त्यांनी चांगले काम केले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरात गुंडगिरी वाढली असून चोऱ्याचपाट्यांसह वाहतुकीची कोंडी हे नित्याचेच झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील नागरिक धास्तावले आहेत. गेल्या महिन्यातच एका टोळीने शहरातील फुलेवाडी रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक जाळून टाकल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. परंतु टोळीने बॅंक पेटवून देईपर्यंत पोलिसांना भणकही लागली नव्हती.
याशिवाय शहरातील स्टेशन रस्त्यावरील आयडीबीआय बॅंकेचे एटीएम दोनदा गॅस कटरच्या साह्याने फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केली होती. या घटनेतील चोरट्यांचा तपास पोलिसांना अजूनही लागलेला नाही. लहानसहान घटनेनंतर पोलिस ठाण्यासमोर जमा होणारा जमाव, जमावाकडून होणारी दादागिरी, पोलिस ठाण्यात 'सुपारी' घेऊन येणाऱ्या दलालांमुळे ठाणे नेहमीच चर्चेत असायचे.
याशिवाय तत्कालीन सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या बदलीनंतर फोफावलेले अवैधधंदे नागरिकांच्या नजरेतून सुटले नाहीत. जुगार अड्डे, मटका, अवैध दारू विक्री, आॅनलाईन सट्टा अशा धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे हे धंदे मोडीत काढण्याचे मोठे आव्हान ताईतवाले यांच्यासमोर असणार आहे.
शहरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही खांदेपालटही आवश्यक आहे. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 'बीट' ही त्यांची मक्तेदारी झाली आहे. अनेक दिवसांपासून ते तेथेच ठाण मांडून आहेत. तसेच गोपनीय शाखेलाही 'बुस्टर डोस' गरजेचा असून हे कर्मचारीही जागा 'अडवून' बसले आहेत. त्यांचा एकंदरीतच परफाॅर्मन्स पाहता त्यांना 'नारळ' देण्याची वेळ आली असल्याचा सूर नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. आवक - जावक व अन्य महिला कर्मचारीही नेहमीच 'फौजदारा'च्या भूमिकेत असतात. त्यामुळे त्यांनाही समज देण्याची गरज आहे.
बदली रोखण्यासाठी 'देव' पाण्यात!
दरम्यान वैजापूर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी सत्यजित ताईतवालेंची वर्णी लागू नये म्हणून काही पोलिस कर्मचारी 'देव' पाण्यात घालून होते. त्यांनी बदलीत खोडा घालण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे जाऊन 'लोटांगणं' घातली. या कर्मचाऱ्यांनी ही बदली रोखण्यासाठी 'मोट' बांधूनही त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी अगोदरच ताईतवालेंना 'हिरवा' कंदील दाखविलेला होता. परंतु याची भणकही या कर्मचाऱ्यांना नव्हती. हे विशेष!
Social Plugin