पालिकेच्या इमारतीसह जलशुद्धीकरण केंद्र, पोलिस ठाण्यांची उभारणी करा!
गेल्या काही दिवसांत वाढत्या लोकसंख्येचा विस्तार पाहता वैजापूकरांना (Vaijapur ) पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र साठवण तलाव उभारणीबरोबरच नूतन जलशुद्धीकरण केंद्र व पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी निधी ( Funds ) उपलब्ध करून देण्यात यावा. अशी मागणी आमदार प्रा. रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare) यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2025) केली. दरम्यान आमदार बोरनारेंनी मुख्य प्रश्नांना हात घालून शहरवासियांना दिलासा दिला आहे.
मुंबई येथे सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात आमदार रमेश बोरनारे यांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघातील (Vaijapur Assembly Constituency) विविध समस्यांचा उहापोह केला. विशेषतः त्यांनी नागरी समस्या पटलावर आणून राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिले. वैजापूर शहराची (Vaijapur City)लोकसंख्या जवळपास ८० हजार आहे. अशा परिस्थितीत शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी नेहमीच नाशिक जिल्ह्यातील (Nashik District ) पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. पावसाळ्याचा अपवाद वगळता नाशकातून पाणी सोडले तरच वैजापूकरांची तहान भागते. परंतु तहानलेल्या वैजापूरकरांना नेहमीच पश्चिम महाराष्ट्राकडून सापत्न वागणूक मिळते. मग नांदूर मधमेश्वर कालव्याचे (Nandur Madhmeshwar Canal) पाणी असो की पिण्याचे पाणी असो. यासाठी नेहमीच संघर्ष पेटतो.
पिण्याच्या पाण्यासाठी कोपरगाव तालुक्यात पालिकेचे चार घोयगाव साठवण तलाव असले तरी ते पुरेसे पडत नाही. परिणामी ऐन उन्हाळ्यात शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या पार्श्वभूमीवर आमदार बोरनारे यांनी पाण्याची दाहकता शासनाच्या निदर्शनास आणून दिली. नूतन साठवण तलावासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. याशिवाय पालिकेला नूतन जलशुद्धीकरण केंद्र व प्रशासकीय इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
वैजापूरसह शिऊर, वीरगाव व शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या इमारती निजामकालीन असून जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या इमारतींसाठीही निधींची आवश्यकता आहे. याशिवाय पोलिस ठाण्यात मनुष्यबळ वाढविण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या व गुन्हेगारी पाहता शासनाने संवेदनशील होऊन या मागण्यांच्या पूर्ततेबाबत तातडीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे बोरनारे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात शहरवासियांना होणारा अल्प पाणीपुरवठा, अशुद्ध पाणी, पालिकेच्या कारभाराचा झालेला खेळखंडोबा पाहता सोयीसुविधायुक्त प्रशासकीय इमारत असणे आवश्यक आहे. या विविध प्रश्नांवर विधानसभेत आमदार बोरनारे यांनी आवाज उठवून नागरिकांची मने जिंकली आहेत.
वैजापूर ग्रामीण स्वतंत्र ठाणे करा
वैजापूर पोलिस ठाण्यातर्गंत सध्या ५४ गावांचा कारभार चालतो. सध्या ज्या गावांचा कारभार या पोलिस ठाण्यातर्गंत चालतो. ही सर्व गावे वैजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याला जोडण्यात यावी. यासाठी तालुक्यातील भग्गाव येथे जागा निश्चित करण्यात आलेली आहे.शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात साधारणतः १० वर्षांपूर्वी गृहविभागाला प्रस्ताव सादर केलेला आहे. वाढती लोकसंख्या व गुन्हेगारी लक्षात घेऊन मनुष्यबळही वाढविले पाहिजे. असेही बोरनारे यांनी यावेळी सांगितले.
कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती करा
पालिकेमार्फत स्वच्छतेची निविदा काढून तो ठेका एखाद्या ठेकेदाराला देण्यात येतो. परंतु स्वच्छतेची कामे इमानदारीने होत नाही. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना तात्पुरती नियुक्ती देऊन ही कामे पालिकेमार्फत करण्यात यावी. त्यामुळे शहरात खऱ्या अर्थाने स्वच्छतेचे काम होईल. असा मुद्दाही बोरनारे यांनी मांडला.
Social Plugin