वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वैजापूर: काही दिवसांपासून तरुणीने फोन केला नाही म्हणून तरुणाने मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना १७ मार्च रोजी सकाळचा सुमारास वैजापूर तालुक्यातील जळगाव शिवारात घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या दोघांचे अगोदर प्रेमप्रकरण होतं. परंतु तिचं लग्न ठरलं आणि तिने त्याच्याशी बोलणं बंद केलं.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेतील तरुणी ही वैजापूर तालुक्यातील हडसपिंपळगाव रहिवासी असून इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे व एका तरुणासोबत मागील वर्षभरापासून ओळख होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने ते एकमेकांसोबत फोनवर बोलत असत.
दरम्यान मुलीचे लग्न ठरल्याने मागील तीन महिन्यांपासून तिने त्याच्याशी फोनवर बोलणे बंद केले. मात्र 'तो' मुलीचे नातलग व तिच्या गावातील अन्य नागरिकांना फोन लावून 'तिला माझ्याशी बोलायचे सांगा' असे म्हणत असे. सुरू असलेला प्रकार मुलीने तिच्या आईवडिलांच्या कानावर टाकला. त्यांनीही त्याला समजावून सांगितले. परंतु त्याच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही.
पुन्हा एके दिवशी 'त्याने' मुलीच्या आजोबांच्या फोनवर 'माझ्यासोबत लग्न कर तुला कोण धमकी देतो मला सांग.' असा मेसेज (संदेश) पाठविला. अखेर मुलीने तिचे आईवडिल व अन्य नातेवाईकांसह सोमवारी सकाळी जळगाव (ता. वैजापूर) गाठले. त्यावेळी त्यांनी 'त्याच्या' घरासमोर जाऊन त्याच्या आईवडिलांना समजावून सांगत असताना त्याने त्यांना शिवीगाळ करून मुलीला तू मला फोन का नाही केला ? असे म्हणून तिचा हात पकडून विनयभंग केला. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin