मुघल शासक औरंगजेबाच्या कबरीवरून (Aurangzeb Tomb) वातावरण चांगलेच तापले आहे. आता या विषयावर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील (Former MP Imtiyaz Jaleel) यांनी सोशल मीडियावर (Social media) पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ते पत्रात म्हणतात की, मी स्वतः इतिहासाचा अभ्यासक नाही. औरंगजेबावर (Aurangzeb ) मीच का बोलावं? असा सवाल करीत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व विरोधकांनी बोललं पाहिजे, त्या काळात औरंगजेब एक राजा होता ही वस्तुस्थिती आहे. औरंगजेबाने प्रांत जिंकण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम पातशाह्यांशी सुध्दा संघर्ष केले. प्रत्येक राजा सत्तेसाठी स्वतःच्या रक्ताच्या नातलगांशी लढला. त्याचा धर्म कोणता हा प्रश्नच नाही. तो त्याकाळी राजा होता, तेव्हा लोकशाही नव्हतीच पण आज लोकशाही आहे. याचा विसर आपल्याला पडतोय. याच्याइतकी मोठी शोकांतिका नाही.
ते म्हणाले, ‘मला औरंगजेब या विषयावर बोलते करण्याचा प्रयत्न अनेक माध्यमे करीत आहेत. सर्वप्रथम या सर्व माध्यमांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे. मी मुसलमान लोकप्रतिनिधी आहे म्हणून जर तुम्ही मला बोलते करू इच्छित असाल तर तुमच्या पत्रकारितेत खोट आहे. मी भारतीय मुसलमान आहे, हे नक्की. मात्र ते भारतीय असणे तुम्हाला एरवी आठवत नाही. याच्या वेदना होतात. बाबरी मशीद प्रकरण पेटवून भाजपा मोठी झाली. आता औरंगजेबाची कबर उध्वस्त करायच्या धमक्या काही धर्मांध संघटना देत आहेत. त्यावर सत्ताधारी मौन आहेत. इतकेच नव्हे तर शाहू, फुले व आंबेडकरांची परंपरा सांगणारेही मौन आहेत हे अधिक आश्चर्यकारक आहे’. असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
Social Plugin