Hot Posts

6/recent/ticker-posts

HSRP Number Plate | 'ही' नंबर प्लेट कोठून खरेदी करायची? किंमत किती? RTO कडून कधी होणार जनजागृती?

 वाहनधारकांत संभ्रमावस्था  


वैजापूर: सध्या वाहनांच्या नंबर प्लेटवरून (नोंदणी पाटी) राज्यात रणकंदन सुरू आहे. याबाबत शासनाने नंबर प्लेटसाठी वाहनधारकांना 'तारिख पे तारीख' दिली खरी. परंतु मुख्य प्रश्न हा आहे की, ग्रामीण भागातील वाहनधारक अजूनही याबाबत अनभिज्ञ आहेत. या नबंर प्लेट कोठून खरेदी करायच्या? त्याची किंमत किती? असे अनेक प्रश्न वाहनाधारकांसमोर आहेत. प्रादेशिक परिवहन महामंडळाकडून कोणतीही जनजागृती करण्यात आली नाही. एकंदरीतच याबाबत चित्र स्पष्ट नसल्याने संभ्रमावस्था आहे.


सन २०१९ पूर्वीच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी शासनाने एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) बसविण्याबाबत शासन निर्णय जारी केला असून आता यासाठी ३० जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पण यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारची जनजागृती करण्यात आलेली नाही. यामुळे नंबर प्लेट कोठून ? कशी ? किती रक्कम देऊन खरेदी करायची याबाबत वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. मात्र हा संभ्रम दूर करण्यासाठी सध्यातरी प्रादेशिक परिवहन विभाग व स्थानिक पोलिस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची जनजागृती करण्यात आलेली नाही. नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी नवीन डेडलाईन जारी करण्यात आली आहे. आतापर्यंत अपेक्षित वाहनांना एचएसआरपी प्लेट न झाल्याने ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही नंबर प्लेट बसवण्याच्या निर्णयावरुन अनेक वाद उद्भवले होते. 

दरम्यान, राज्य सरकार जास्तीचे पैसे आकारण्यावरुन सरकारवर टीका देखील झाली होती. दरम्यान दिवसेंदिवस सर्वच नियम व कायद्यांत बदल होत आहेत. परंतु अशा परिस्थितीत नागरिकांनी कोणकोणत्या नियमावली लक्षात ठेवायच्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अगोदर शेकडो मोटार वाहन कायदे असताना आता या नवीन नियमावलीची भर पडली आहे. अगोदरच्या नियमांची पूर्ण माहिती नसतानाच नवीन - नवीन नियमावली येऊन धडकत आहे. 

नियमावली करा, परंतु त्याबाबत जनजागृती होणेही तितकेच गरजेचे आहे. 'एचएसआरपी'चा नवीन नियमावली आली. गावखेड्यात तर जाऊ द्या, तालुकास्तरावरही याबाबत अनभिज्ञता आहे. नंबर प्लेट कोठून खरेदी करायची? तिचा विशिष्ट कोडवर्ड काय? ती बनावट तर नाही ना? याबाबत कुणालाच काही माहिती नाही. अशा परिस्थितीत वाहनधारकांची 'गोची' झाली आहे. पोलिस असो की, परिवहन महामंडळाचे कर्मचारी. नियमावलीबाबत पुस्तक बघून कारवाई करण्याची वेळ येते. त्यामुळे सामान्य नागरिकांनी नियमावली पाळण्याबाबत काय- काय लक्षात ठेवायचे? असा प्रश्न आपसूकच पडतो. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक प्रश्न उद्भवलेले असताना शासनाची वेगवेगळ्या नियमावली लक्षात ठेवून धावाधाव करण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. नियमावली लागू केली खरी, परंतु त्याबाबत वाहनचालकांना आकलन होईल. अशी अगोदर जनजागृती करा. तरच नियम पाळले जातील. असे वाहनधारकांचे म्हणणे आहे. जनजागृतीच नाही तर वाहनधारकांनी कुठे जाऊन माहिती घ्यायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.




'एचएसआरपी' संदर्भात आता वैजापूर शहर अथवा ग्रामीण भागात आतापर्यंत जनजागृतीपर कोणताही कार्यक्रम घेण्यात आला नाही. परिवहन महामंडळ अथवा पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती वाहनधारकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे या नंबर प्लेटबाबत संभ्रमावस्था आहे.