छत्रपती संभाजीनगर: मार्च अखेर असल्यामुळे महावितरणकडून जोरदार वसुली मोहिम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत वसुली पथक गावात गेले असताना वरातीसाठी निघालेल्या नवरदेवाने स्वतःहून आमच्याकडे काही थकबाकी आहे का? असे विचारत आधी थकबाकी अदा केली आणि नंतर बोहल्यावर चढला. नवरदेवाच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून हाच आदर्श घेत थकबाकीदारांनी बील अदा करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
सोयगाव तालुक्यातील कंकराळा गावातील अजय सोनाजी पाटील हा तरुण लग्नापूर्वी सकाळी हळदीसाठी विवाहस्थळी जात होता. नेमके त्याचवेळी महावितरणच्या सोयगाव शाखेचे विद्युत सहायक ज्ञानेश्वर सूर्यवंशी व त्यांचे सहकारी वीजबिल वसुली मोहिमेसाठी कंकराळा येथे आले होते. सूर्यवंशी यांना पाहताच नवरदेव अजयने आमच्याकडेही काही वीजबिल बाकी आहे का, अशी विचारणा केली.
त्यावर सूर्यवंशी यांनी थकबाकी नाही, पण १३४० रुपयांचे चालू वीजबिल असल्याची माहिती दिली. वीजबिल भरण्यास मुदत असूनही नवरदेवाने बिलाची रक्कम कर्मचारीकडे सुपूर्द करून बिल भरण्यास सांगितले. नवरदेवाच्या या तत्परतेमुळे महावितरण कर्मचाऱ्यांनाही सुखद धक्का बसला. लग्नासारख्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगीही कर्तव्याचे भान अजय पाटील यांनी ठेवले.
Social Plugin