दिल्ली: बलात्कार प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या वादग्रस्त आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. तसेच हायकोर्टाला चांगलेच खडसावले आहे. अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे आणि पायजम्याची नाडी खेचणे तसेच तिला पुलाखाली खेचणे हा बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असा निर्णय अलाहाबाद हायकोर्टाने दिला होता. अलाहाबाद न्यायालयाने हे कृत्य प्रथमदर्शनी पोक्सो कायद्यांतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा वाटतो असे म्हटले होते. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्या. एजे मसीह यांच्या खंडपीठाने न्यायाधीशांची बुधवारी या प्रकरणाची सुनावणी घेतली.
सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान आदेश लिहिणाऱ्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खंडपीठाने म्हटले की, हायकोर्टाच्या आदेशात केलेल्या काही टिप्पण्या पूर्णपणे असंवेदनशील आणि अमानवी वृत्तीचे प्रतिबिंबित करतात. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, उत्तर प्रदेश सरकार आणि इतर पक्षांना नोटीस बजावली आणि त्यांचे उत्तर मागितले आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय स्वतः ऐकण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर कायदेतज्ज्ञ, राजकारणी आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलेल्या निषेधानंतर सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली.
संवेदनशीलतेचा अभाव
सुप्रीम कोर्टाने सॉलिसिटर जनरल आणि अॅटर्नी जनरल यांना सुनावणीदरम्यान कोर्टाला मदत करण्यास सांगितले आहे. न्यायमूर्तींनी असे शब्द वापरल्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. हे प्रकरण स्वतःहून दखल घेण्यात आले आहे. हायकोर्टाचा आदेश आम्ही पाहिला आहे. हायकोर्टाच्या आदेशातील काही परिच्छेद २४, २५ आणि २६ न्यायाधीशांच्या बाजूने संवेदनशीलतेचा पूर्ण अभाव दर्शवतात. हा निर्णय घाईघाईने घेतला गेला असेही नाही. चार महिन्यांनी हा निकाल सुनावण्यात आला आहे. पीडितेच्या आईनेही कोर्टात धाव घेतली आणि तिची याचिकाही त्यात जोडली जावी, असे न्यायमूर्ती गवई म्हणाले.
पीडितेच्या आईची याचिका
'वी द वुमन ऑफ इंडिया' या संस्थेने अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयावर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पीडित मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, आरोपी पवन आणि आकाशने ११ वर्षीय पीडितेच्या गुप्तांगाला स्पर्श केला व आकाशने पायजमाची नाडी तोडली व पुलाखाली ओढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी पवन आणि आकाश या दोघांना कासगंज कोर्टाने बलात्कार आणि पोक्सो कलम १८ अंतर्गत समन्स बजावले होते.
Social Plugin