वैजापूर पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
वैजापूर: तालुक्यातील अगरसायगव येथे गोमांसाने भरलेले वाहन गोरक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान या वाहनात पावणे दोनशे किलो गोमांस आढळून आले. कारवाई दरम्यान पोलिसांनी गोमांस वाहतूक करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले असून एकाने घटनास्थळाहून धूम ठोकली.
नासेर शेख अब्बास शेख (रा. लाडगाव रोड, वैजापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव असून त्याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरसायगाव येथील ग्रामस्थांना शुक्रवारी सकाळी गावातील समाज मंदिराच्या पाठीमागे एका बोलेरो वाहनातून ( एम एच ०४- ई एल ३४०६) गोमांस येत असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच सकाळी अकरा वाजता ग्रामस्थांनी वाहन अडविले. वाहन अडविताच वाहनातील एकाने घटनास्थळाहून पळ काढला. यावेळी ग्रामस्थांनी वाहन चालकाला त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नासेर शेख अब्बास शेख असून आपण वैजापूर शहरातील लाडगाव रोड येथील रहिवासी असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी वाहनाची पाहणी केली असता त्यांना त्यात दीडशे ते पावणे दोनशे किलो गोमांस, कुऱ्हाड व कोयते आढळून आले. लगेचच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील नरवडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहन व गोमांस असा दीड लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालासह चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी चालकाला पळून गेलेला इसम कोण, गोमांस कुठून आणले व कोठे नेले जात होते? याबाबत चौकशी केली असता चालकाने पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. याप्रकरणी नासेर शेख अब्बास शेख व एका एकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin