वळण शिवारातील घटना
वैजापूर: शेतवस्तीवर घरासमोर खेळत असलेल्या ३ वर्षीय मुलीवर चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वैजापूर तालुक्यातील वळण शिवारात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
ऋतुजा सचिन कर्डक ( वय ३ वर्षे रा. तांदुळवाडी ता.गंगापूर ) असे घटनेतील मृत मुलीचे नाव आहे.या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ऋतुजा ही आईसोबत वळण येथे मामाच्या गावी आलेली होती. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ती घरासमोर खेळत असताना बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केल्याने ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. तिला या अवस्थेत नातेवाईकांनी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. चिमुकलीच्या गेल्याचे समजताच तिच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयातच आक्रोश करायला सुरुवात केली. हा आक्रोश बघून उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित कर्मचाऱ्यांचेही कडा पाणावल्या.घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
'ती' घटना अजून ताजीच
वैजापूर तालुक्यातील वळण परिसरापासून काही किमी अंतरावर असलेल्या कविटखेडा शिवारात साधारणतः दोन महिन्यांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.तेव्हा बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाग अयशस्वी ठरला होता.
वनविभाच्या हलगर्जीपणाचा बळी
चिमुकल्याचा मृत्यूनंतर बिबट्याचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अयशस्वी ठरल्याने पुन्हा एका चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यामुळे वनविभाच्या हलगर्जी पणामुळेच या चिमुकलीचा मृत्यू झाला.असा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.
Social Plugin