चालकाला दिली नोटीस
वैजापूर: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तासन तास जागा उपलब्ध करुन देणाऱ्या येवला रोडवरील 'आय लव्ह कॅफे सेंटर'वर वैजापूर पोलिसांनी सोमवार (ता.११) रोजी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सहा तरुण व तीन तरुणींना ताब्यात घेतले. काही वेळाने त्यांना समज देऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान कॅफे चालकाला नोटीस बजाविण्यात आली आहे.
वैजापूर शहरात महाविद्यालयासोबतच विविध शिकवणीचे वर्ग आहेत. यामुळे तालुक्यातील विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. तरुण-तरुणींची संख्या वाढल्याने शहरात कॅफेची संख्या देखील वाढली आहे. मात्र यापैकी अनेक कॅफे मध्ये प्रायव्हसीच्या नावाखाली कॅफेचालक स्वतंत्र व्यवस्था करून देतात. यासाठी २०० ते ५०० रुपयांपर्यंत प्रती तास पैसे उकळले जातात. तसेच या कॅफे शॉपमध्ये स्वतंत्र कक्ष उपलब्ध करुन दिले जात असल्याने महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
यातून वाढणारे गैरप्रकार लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोमवारी येवला रोडवरील एका महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या 'आय लव्ह कॅफे' शॉपवर छापा टाकून या कारवाईत पोलिसांनी सहा तरुण, तीन तरुणी कॅफेमध्ये होत्या. यापैकी काही मुलं-मुली जोडप्याने बसलेली होती. पोलिसांनी सर्वांना पोलिस ठाण्यात आणून संबंधित मुलांच्या आई वडिलांना बोलावून त्यांच्या समोर तरुण-तरुणींना समज देत पालकांच्या स्वाधीन केले.
तसेच कॅफे चालकावर कारवाई करून त्यास नोटीस बजावून कॅफेचालकास स्वतंत्र कक्ष बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नागरगोजे, भुरे, नरवडे, कुन्हाडे, नाचन यांच्या पथकाने केली.
Social Plugin