सप्ताहास भक्तिमय वातावरणात प्रारंभ
वैजापूर: तीन जिल्ह्यांसह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सराला बेटावरील गंगागागिरी महाराज १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास ३० जुलै रोजी तालुक्यातील शनिदेवगाव येथे भक्तिमय वातावरणात सुरवात झाली. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हत्तीसह घोडे, उंट, ढोलताशे, लेझीम, झांज व सनई-चौघड्यांच्या निनादत निघालेली मिरवणूक डोळ्यांचे पारणे फिटणारी ठरली.
वारकरी संप्रदायाचा महाकुंभ समजला जाणारा १७८ वा योगिराज सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने बुधवार दि. ३० जुलै रोजी तालुक्यातील बाजाठाण येथील आशुतोष महादेव मंदिरापासून सकाळी १० वाजता सजविलेल्या अश्वरथातून गोदाधाम सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांची हत्ती, घोडे, उंट, ढोलताशा, लेझिम व झांज पथकाच्या गजरात, सनई चौघड्यांच्या निनादात गावातील भजनी मंडळाच्या सुश्राव्य अभंगवाणीसह टाळ मृदुंगाच्या गजरात सप्ताहस्थळापर्यंत भव्य ऐतिहासिक मिरवणूक निघाली होती.
यावेळी रस्त्यावर जागोजागी ऐतिहासिक देखावे, चित्ररथातून चक्रधर स्वामी लिळाचरित्र, ज्ञानेश्वरीचा पैस खांब, संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन, विठ्ठल रुक्मिणी चित्ररथ, विठु माझा लेकुरवाळा चित्ररथ, श्रीराम-लक्ष्मण हरिणवध देखावा असे वेगवेगळे समाज प्रबोधनपर देखावे, सप्तक्रोशी ग्रामस्थांचे व विविध शाळेतील, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे देखावे हे भाविकांचे प्रमुख आकर्षण होते.
शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समाज प्रबोधनपर देखावे व पथनाट्यांचे सादरीकरण सप्तक्रोशी ग्रामस्थांच्या नियोजनातून करण्यात आले. मिरवणूक मार्गावर सप्तक्रोशी गोदातीरी शिवारातील माळरानावर कलशधारी सुवासिनी, तुळशीवृंदा महिला, संतमेळा व सहभाग, ढोलपथकांचा रिंगण सोहळा, लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.
मिरवणूक भजन मंडपात पोहोचताच रामगिरी महाराज यांच्याहस्ते अखंड यज्ञ प्रज्वलित करून, सद्गुरु गंगागिरी महाराज, ब्रम्हलिन नारायणगिरी, संत ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्यासह सर्व संताच्या प्रतिमांचे पुजन, विणापुजन करुन पंचपदी गायनाने अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी रामगिरी महाराज म्हणाले की, अखंड हरिनाम हा तपस्या यज्ञ असून गंगागिरी महाराज हे निष्काम संन्याशी होते, त्यांच्या परंपरेतील हे कार्य बेटाचे सेवक म्हणून आम्ही पुढे नेत आहोत, अहोरात्र ११ हजार टाळकऱ्यांच्या उपस्थितीत १६८ भक्तिचा जागर होणार आहे. फक्त भक्ती करताना ती निस्वार्थ अंतःकरणाने केली पाहिजे. भक्तिमय वातावरणात सप्ताह पार पडू दे व शेतकरी सुखी होऊ दे. अशी प्रार्थना याप्रसंगी महाराजांनी केली.
पहिल्याच दिवशी मांडे व पुरणपोळीचा महाप्रसाद सालाबादप्रमाणे याही वर्षी वाटप करण्यात आला. कोपरगाव, येवला, नांदगाव, श्रीरामपूर, वैजापूर, गंगापूर व सप्ताह सप्तक्रोशितील गावांतील भाविकांनी मांडे व पुरणपोळी, लक्ष्मीमाता दूध संकलन केंद्राचे बाबासाहेब चिडे, केशव शिदे व मित्र परिवाराकडून भाविकाना दुधाच्या रुपाने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कुषीमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार रमेश बोरनारे, अविनाश गंलाडे, बाबासाहेब चिडे, बाळासाहेब कापसे, वंदना मुरकुटे, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज, योगेंद्रगिरी महाराज सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, सरला संस्थानमधील भजनी मडळीसह मोठ्या संख्येने भाविकाची उपस्थिती होती. दरम्यान यानिमित्ताने कृषी प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार रमेश बोरनारे यांच्याहस्ते करण्यात आले.
Social Plugin