Hot Posts

6/recent/ticker-posts

Nationalist Congress party | वैजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला गटबाजीचे 'ग्रहण', पक्षनिरीक्षक एक, बैठका दोन

पक्षनेतृत्वाची वाढणार डोकेदुखी 

वैजापूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ पातळीवर नेत्यांची बेताल वक्तव्ये आणि गैरवर्तन यावरून आधी पक्ष अडचणीत आहे. आता स्थानिक पातळीवरील अंतर्गत राजकारणामुळे वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. वैजापूरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. शहरात आलेल्या पक्ष निरीक्षक संजय जाधव यांना गटबाजीचे दर्शन झाले. गटबाजीमुळे संजय जाधव यांना शहरात दोन स्वतंत्र आढावा बैठका घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. त्यामुळे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.


शहरातील ठक्कर बाजारमध्ये पक्षाच्या कार्यालयात व मुरारी पार्क भागात आयोजित या बैठकींमध्ये पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापसातील मतभेद उघडपणे मांडले. पक्षातील ही अंतर्गत खदखद पाहून जाधव यांनी खेद व्यक्त केला असून, पक्षाच्या एकजुटीसाठी योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. मुरारी पार्कमधील बैठकीस ॲड. प्रताप निंबाळकर, तालुकाध्यक्ष विजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके, ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, सुधाकर बागुल, विधानसभा अध्यक्ष एल. एम. पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

या बैठकीत तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून चर्चा तापली. विद्यमान तालुकाध्यक्ष विजय पवार यांना कायम ठेवण्याची मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली तर दुसऱ्या गटाने डोंगरथडी भागातील विशाल शेळके यांच्या नावाला पसंती दर्शवली. विशाल शेळके यांना तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्याची एकमुखी मागणी यावेळी झाली. पक्षनिरीक्षक संजय जाधव यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मत ऐकून घेऊन या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. 

मात्र पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे एकजुटीवर परिणाम होत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. दुसरी बैठक ठक्कर बाजारमधील पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अकिल शेख, पंकज ठोंबरे, दत्तात्रय त्रिभुवन, बाळासाहेब भोसले, सूरज पवार, बाळू शेळके, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

 दरम्यान शहरात झालेल्या पक्षाच्या दोन बैठका व त्यामधील चर्चेमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून कार्यकर्त्यांमधील मतभेद एवढे टोकाला गेले की, पक्षाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षनिरीक्षक संजय जाधव यांनी दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला असला, तरी येणाऱ्या काळात पक्ष नेतृत्वाची हा वाद मिटवण्यासाठी कसोटी लागणार आहे. 

आले 'चार्जिंग'साठी अन् घडले वेगळेच!

पक्षनिरीक्षक संजय जाधव यांच्यासमोरच पक्षातील गटबाजीचे हिडीस प्रदर्शन झाल्याने त्यांनी खंत व्यक्त करून दाखविली. ते शहरात कार्यकत्यांना 'चार्जिंग' करून पक्षबांधणीसाठी आले होते. परंतु पक्षसंघटन मजबूत करण्याचा सल्ला देता- देता पक्षात 'एकजूट' ठेवा. असा उपदेश कार्यकर्त्यांना देऊन त्यांना परतण्याची वेळ आली. स्थानिक पातळीवर पक्षाला गटबाजीचे 'ग्रहण' लागल्यामुळे हा 'मिलाफ' घडवून आणण्यासाठी पक्षनेतृत्वाची कसोटी लागणार आहे. एवढे मात्र निश्चित!