Hot Posts

6/recent/ticker-posts

Gram panchayat embezzlement | १३ ग्रा.पं.मध्ये 'हेराफेरी', तक्रार मात्र एकच,पंचायत समिती प्रशासनाची 'टोलवाटोलवी', कारवाईचे काय ?

३४ लाखांचे अपहार प्रकरण

वैजापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या बॅंक खात्यांवरून ऑपरेटरने ३४ लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून घेतल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. हडपलेली रक्कम ऑपरेटरकडून वसूल करण्यात आली असली तरी ऑपरेटरविरुद्धच्या पुढील कारवाईचे काय? हा प्रश्न सध्या गुलदस्त्यात आहे. तालुक्यातील भग्गाव ग्रामपंचायतीने वैजापूर पोलिस ठाण्यात रक्कम हडपल्याबाबत तक्रार दिली खरी; परंतु तांत्रिक अडचणींमुळे अजूनही हे प्रकरण चौकशी स्तरावर आहे. १३ ग्रामपंचायतींत अपहार झालेला असताना कारवाईसाठी केवळ एकच ग्रामपंचायत पुढे येते तर दुसरीकडे गटविकास अधिकाऱ्यांनीही 'कातडी बचाव' धोरण स्वीकारून नामानिराळे होण्याचा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक पाहता ३४ लाखांच्या अपहारावर गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींना गुन्हे दाखल करण्याचें आदेश देणे अपेक्षित असताना ते 'मौन' धरून आहेत.


      वैजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १३ ग्रामपंचायतींचे ३४ लाख १५ हजार ५९२  रुपये तालुक्यातील भग्गाव ग्रामपंचायतीचा ऑपरेटर अविनाश पवार याने स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. शासनाच्या विविध योजनांचा निधी ग्रामपंचायतीला शासनाकडून देण्यात येतो. हा निधी डीएससीद्वारे ( डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट) संबंधित काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतो. सरपंच व ग्रामसेवकांच्या नावाने ही डीएससी असते. सरपंच व ग्रामसेवकांना व्यवहार झाल्यानंतर संदेश मिळतो. कामांची रक्कम वाटप करताना तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या ३४ लाख १५ हजार ५९२ रुपयांचा निधी अविनाश पवार या खासगी ऑपरेटरने स्वतःच्या बॅंक खात्यामध्ये वळवून घेतला. 

दरम्यान या पवार याने हडपलेली रक्कम पुन्हा भरली. या वृत्ताला पंचायत समिती प्रशासनाने दुजोरा दिला असला तरी ऑपरेटरविरुद्ध कुठली कायदेशीर कारवाई होणार का? सरकारी रक्कम काढून ती पुन्हा भरली तर तो गुन्हा ठरत नाही का?  परंतु याबाबत प्रशासन 'मुग' गिळून गप्प आहेत. फक्त रक्कम भरली म्हणून प्रशासनाने कारवाईचे 'अस्त्र' म्यान केले म्हणायचे का? असे असेल तर उद्या कुणीही शासनाची रक्कम वापरून पुन्हा भरतील अन् नामानिराळे होतील. 

परंतु गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर हा चेंडू टोलविण्याचा प्रयत्न करून ही जबाबदारी ग्रामपंचायतींवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक पाहता या प्रकरणात त्यांनी 'कचखाऊ' भूमिका न घेता कणखर भूमिका घेणे अपेक्षित आहे. रक्कम भरल्यानंतर या प्रकरणातील सकारात्मक बाजू ती काय असेल तर ती आहे भग्गाव ग्रामपंचायतीची तक्रार. यापलिकडे या प्रकरणात कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. 

ग्रामपंचायतींचा कारभार गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली चालतो. मग 'टोलवाटोलवी' करून कसे जमणार? असा प्रश्न यानिमित्ताने पडतो. दस्तूरखुद्द आमदार रमेश बोरनारे यांनी 'या प्रकरणात कुणाला सोडू नका'. अशी सक्त ताकीद दिली होती. पोलिस यंत्रणा चौकशीअंती निर्णय घेतील. हा भाग वेगळा असला तरी या अपहाराचा ठपका काही प्रमाणात पंचायत समिती प्रशासनावर ठेवला तरी वावगं ठरणार नाही. 

एखादा खासगी ऑपरेटर लाखोंना 'चुना' लावून जातो अन् ग्रामपंचायती आणि पंचायत समितीला 'भणक'ही लागू नये. एवढी मोठी रक्कम हडपेपर्यंत यंत्रणा गाफील कशी? याचाच अर्थ ग्रामपंचायतींवर पंचायत समिती प्रशासनाचा अंकुश नाही. हे सिद्ध होते. 'आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय' कारभार सुरू असल्याचे हे द्योतक आहे. 

कोणत्या ग्रामपंचायतीतून किती रक्कम काढली?

चोरवाघालगाव ५ लाख ३४ हजार ८५८

मनेगाव १ लाख ९१ हजार २२२

अंचलगाव ७४ हजार ८८१

सटाणा ४ लाख ६ हजार ४४१

हाजीपुरवाडी ४ लाख ८८ हजार ६९४

रघुनाथपुरवाडी २ लाख ९४ हजार २४

वडजी १ लाख ८३ हजार ७५४

अव्वलगाव १ लाख ४१ हजार 

भग्गाव १ लाख ५६ हजार ५८०

बेलगाव २ लाख ६ हजार ६१५

खरज ३ लाख ८६ हजार ५८४

भिवगाव २ लाख १२ हजार ३४०

तलवाडा १ लाख ४८ हजार ९७२

मोबाईल फाॅरमॅट अन् टाळाळ  

दरम्यान यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, अगोदर बीडीओ वेणीकरांनी भग्गाव ग्रामपंचायतीने वैजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे पत्र दिले आहे. मला व्हाॅट्सॲपवर आले आहे. परंतु पत्राची काॅपी मागितल्यानंतर 'त्यांनी माझा मोबाईल फाॅरमॅट झाला'. असे सांगून वेळ मारून नेली.

अविनाश पवार याने हडपलेले ३४ लाख १५ हजार ५९२ रुपये भरले. याबाबत भग्गाव ग्रामपंचायतीने १ लाख ५६ हजार ५८० रुपये परस्पर वळविल्याबाबत वैजापूर पोलिस ठाण्यात अविनाश पवार विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. परंतु ही प्रक्रिया अजून पोलिसांनी चौकशी स्तरावर ठेवली आहे.

- श्रीकृष्ण वेणीकर, गटविकास अधिकारी, वैजापूर 

ऑपरेटरने केलेल्या अपहाराच्या पार्मीश्वभूमीवर  सर्व ग्रामपंचायतींच्या ऑपरेटरसह  ग्रामसेवकांविरुद्ध देखील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. डीएससीवर ग्रामसेवक व सरपंच या दोघांचा अधिकार असतो. त्यामुळे या प्रकरणात सरपंचाचा  काही सहभाग आहे का ? याबाबत चौकशी सुरू आहे.

- अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. छत्रपती संभाजीनगर