Hot Posts

6/recent/ticker-posts

Court Decision | ग्रामसेवकास मारहाण भोवली; 'त्या' दोघांना सश्रम कारावास

वैजापूर न्यायालयाचा निकाल 

वैजापूर: 'माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती आजच द्या' असे म्हणून ग्रामसेवकास अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी सहायक सत्र न्यायाधीश एल. जी. पाच्छे यांनी दोघांना दोन वर्षे सश्रम कारावासासह प्रत्येकी १५ हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली आहे. 


उदय काशिनाथ सोनवणे (३४) व हमीद अहमद जिलानी (३१) अशी शिक्षा सुनाविण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत.  याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी कृष्णा नामदेव किरवे हे वैजापूर तालुक्यातील मौजे खरज येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. ते २४ डिसेंबर २०१८ रोजी वैजापूर पंचायत समिती कार्यालयात टँकर प्रस्ताव कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आले होते. त्यावेळी घटनेतील आरोपी  उदय याने फिर्यादीस फोन करून सभापतीच्या दालनामध्ये बोलावले.

 त्यावेळी उदय व हमीद जिलानी या दोघांनी फिर्यादीची कॉलर धरून दालनात ओढले. त्यानंतर आरोपी उदय याने कृष्णा यांना माहितीचा अधिकार अन्वये 'ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारांची माहिती आजच द्या' अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी 'आपणास मुदतीत माहिती मिळून जाईल' असे उत्तर दिले व माहिती अधिकाराचा अर्ज स्वीकारून त्यांना पोहोच दिली. परंतु त्यानंतर उदय याने त्यांना, 'तू माहिती तर देशीलच, तू सरपंचाचे ऐकतोस' असे म्हणून  चापट-बुक्क्यांनी जबर मारहाण करून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच 'येथून पुढे आमचे म्हणणे ऐकले नाही तर नोकरी कशी करतो व गावाकडे जिवंत कसा जातो ?' अशी धमकी देऊन त्यांच्या हातातून पिशवी हिसकावून त्यातील कागदपत्र फाडून व बॅगेत टाकले. 

या मारहाणीमुळे ग्रामसेवक कृष्णा किरवे हे तिथेच भुरळ येऊन पडले. अशा आशयाची फिर्याद त्यांनी वैजापूर पोलिसांत दिलल्यानंतर  शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी भगवान डांगे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

प्रकरणातील फिर्याद, साक्षीपुरावा व अतिरिक्त सरकारी वकील जी.सी. मंझा यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून दोघा आरोपींना कलम ३५३ प्रमाणे दोन वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावास, कलम ३२३ प्रमाणे तीन महिने साधा कारावास व पाच हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने अतिरिक्त साधा कारावास तसेच दंडाच्या रकमेतून दहा हजार रुपये फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून द्यावी. असे आदेश सहायक सत्र न्यायाधीश  एल.जी.पाच्छे यांनी दिले आहेत. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जी. सी. मंझा व सहायक सरकारी वकील कृष्णा गंडे यांनी कामकाज पाहिले. पैरवी म्हणून सागर विघे यांनी त्यांना सहाय्य केले.