Hot Posts

6/recent/ticker-posts

leopard caught in Vaijapur | थरार: १५ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन.. बोकड.. कोंबड्या.. मग 'तो' जेरबंद!

रेस्क्यू पथकाची धडाकेबाज कामगिरी


वैजापूर: तालुक्यातील डोंगरथडी भागातील दोन चिमुकल्यांसह एका वृद्धेचा बळी घेतल्यानंतर अखेर नरभक्षक बिबट्याला (Man-eating leopard) पकडण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना (Forest Department officials)  यश आले आहे. वनविभागाच्या तब्बल १५ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर (Rescue operation) बिबट्याला जेरबंद करण्यात आले. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान तब्बल दोन दिवसांपासून तालुक्यातील जिरी शिवारात तळ ठोकून असलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी कामगिरी पार पाडली.

वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागात गेल्या तीन महिन्यांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून त्याने दोन चिमुकल्यांसह एका वृद्धेचा बळी घेतला. याशिवाय एका चिमुलीवर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या हल्ल्याच्या घटना पाहता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत होता. हा रोष लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी फिल्डिंग लावली होती. 


छत्रपती संभाजीनगरसह वैजापूर, कन्नड, नाशिक व संगमनेर येथून मनुष्यबळ मागवून बिबट्याचा शोध सुरू होता. याशिवाय पिंजऱ्यासह जाळे, ड्रोन व ट्रॅप कॅमेरेही या परिसरात लावण्यात आले होते. २ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ३० जणांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने बिबट्याला अलगद पकडून पिंजऱ्यात जेरबंद केले. पकडलेला बिबट्या नरभक्षक असल्यामुळे सध्यातरी त्याला नैसर्गिक अधिवासात न सोडता तो सध्या वैजापूर वनविभागाच्या निगराणीत असणार आहे. काही दिवसांनंतर वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घ्यायचा तो घेतील. असे सूत्रांनी सांगितले.

'त्या' दोघांनी इंजेक्शन केले फायर 

पकडलेला हिंस्र प्राणी हा मादी जातीचा असून त्याचे साधारणतः १४ वर्षे आयुर्मान आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कांबळे व शेख या दोघांनी बेशुद्धीचे इंजेक्शन फायर (थ्रो) केले. त्यानंतर बिबट्या जेरबंद झाला.

असा अडकला पिंजऱ्यात 

 रेस्क्यू पथकाने  प्रत्येक पिंजऱ्यात बोकड,कोंबड्या आदी भक्ष्य बिबट्यासाठी टाकले होते. बिबट्याने दुपारी तीन वाजेच्या सुमारास पिंजऱ्यात टाकलेले बोकड , कोंबड्या खाण्यासाठी शिरकाव केला आणि इथेच तो कैद झाला. त्यानंतर लगेचच पथकाने झडप घालून जेरबंद केले. छत्रपती संभाजीनगर येथील वनविभागाचे वनसंरक्षक पी.सी.लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक वनसंरक्षक (कन्नड) प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रिया भिसे, ए.बी.गायके, शिवाजी टोंपे,पी.एम.बर्डे,अनिल पाटील यांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली.

असा आहे घटनाक्रम!

• १ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान झुंबरबाई मांडदे या महिलेवर हल्ला करून बिबट्याने १०० फूट फरफट नेत ठार केले.

• ६:१५ मिनिटाच्या सुमारास महिलेचा मुलास मृतदेह आढळला.

• घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांसह वनविभागाला दिली. त्यानंतर  पोलिसांसह वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.

 • सकाळी १० वाजेच्या सुमारास अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होताच दहशतीत वावरणाऱ्या संतप्त नागरिकांनी संबंधितांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी घटनास्थळी अगोदरच पोहोचलेले आमदार रमेश बोरनारे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संगमनेर व नाशिक येथील फौजफाटा दाखल झाला.

• कन्नड  विभागातील पथकासह संगमनेर,वैजापूर,नांदगाव येथील कर्मचाऱ्यांना पिंजऱ्यांसह पाचारण करण्यात आले व सकाळी ११ :४० च्या सुमारास शोधमोहीम सुरू झाली.

• बिबट्या पकडण्यासाठी ८ पिंजरे तैनात.

• पथकाने लावलेल्या ड्रोन कॅमेरात मध्यरात्री बिबट्या कैद झाला. मात्र त्या ठिकाणाहून बिबट्या काही वेळातच पसार झाला. त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास पुन्हा बिबट्या दिसला. तेथूनही तो अंधाराचा फायदा घेत निसटला शेवटी २ एप्रिलच्या दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी घटनास्थळापासून काही अंतरावर बिबट्या आढळल्याने पथकाने बेशुद्धीचे इंजेक्शन फायर करून बिबट्याला बेशुद्ध केले व मोठ्या शिताफीने ३ : ५५ च्या सुमारास पिंजऱ्यात कैद केले.

नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी नाशिकसह वैजापूर, कन्नड, संगमनेर व छत्रपती संभाजीनगर येथून तब्बल ३० जणांचा ताफा व साहित्य बोलाविण्यात आले होते. बिबट्या जेरबंद झाला असला तरी त्याला लगेचच नैसर्गिक अधिवासात सोडता येणार नाही. कारण तो नरभक्षक असल्यामुळे आणखी कुणावरही हल्ला करू शकतो. त्यामुळे काही दिवस तरी तो आमच्या निगराणीखाली असणार आहे. त्यानंतर त्याबाबत आमचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील.

- प्रिया भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वैजापूर