विषप्रयोग; पत्नीसह मित्र,मेहुणा अटकेत
छत्रपती संभाजीनगर: उपजिल्हाधिकाऱ्याला पत्नीने आई, भाऊ, घरातील मोलकरीण आणि मित्राच्या मदतीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जादूटोणा करून विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळही केली. हा प्रकार २०२१ ते ३० मार्च २०२५ दरम्यान जालाननगर भागात घडला. पत्नीच्या मित्राने पिस्तूल रोखून उडविण्याची धमकी दिली. उपजिल्हाधिकारी देवेंद्र तुकाराम कटके (५०) यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, शस्त्राधिनियम, जादूटोणा प्रतिबंधक कायदा यासह अन्य कलमानुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पत्नी सारिका देवेंद्र कटके (४७, रा. तिरुपती इन्क-लेव्ह, जालाननगर), मित्र विनोद कैलास उबाळे (३८, रा. बोरखेडी, जि. जालना), मेहुणा आतिश साहेबराव देशमुख (४२), सासू सुवर्णा साहेबराव देशमुख (रा. सोनारी, ता. परांडा, जि. धाराशिव), मोलकरीण छायाबाई बालाजी गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. सारिका, विनोद आणि आतिश यांना गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अटक केली. न्या. बी. बी. तोष्णीवाल यांनी तिघांची ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
फिर्यादी देवेंद्र कटके यांच्या तक्रारीनुसार त्यांनी २००० साली सारिका साहेबराव देशमुख (रा. सोनारी, ता. परांडा) हिच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला. सारिकाने एमपीएससी परीक्षेत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला. देवेंद्र यांनी लग्नानंतर पत्नीला लाभ देणे शासनाने बंद केल्याचे सांगितले. त्यानंतर सारिका उद्धटपणे वागू लागली. २०१३ मध्ये कटके यांची संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली. त्यामुळे ते सारिका, दोन मुलांसह जालाननगर येथे राहण्यास आले. मात्र, कटके आणि मुलांशी सारिका तुच्छतेने वागू लागली. अश्लील शिवीगाळ करून आरडाओरड करून भांडण करायची. मुलांकडे पाहून कटके हे शांत राहिले.
२०१५ साली सारिकाच्या एका कृत्यामुळे कटके यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सासरच्यांच्या माफीमुळे ते प्रकरण मिटले. २०१९ मध्ये देवेंद्र हे मुंबईत ड्यूटीवर होते. तेव्हा कोविडमुळे त्यांनी सारिका आणि लहान मुलाला संभाजीनगरातच ठेवले. मोठा मुलगा आयआयटी मुंबईत शिकत होता.
२०२१ मध्ये सारिकाने शाळा सुरू करण्याबाबत हट्ट धरल्याने जालना जिल्ह्यातील बोरखडी शिवारात ग्रिनलँड इंग्लिश स्कूल सुरू करून दिली. त्याचा संपूर्ण खर्च देवेंद्र यांनी केला. शाळेच्या जवळच आरोपी विनोद उबाळेचे सद्गुरु सदानंद नावाचे हॉटेल होते. त्याने आधी कटके यांच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर शाळेच्या कार्यक्रमात जेवणाच्या ऑर्डर घेत असल्याने तो सारिकाचाही मित्र बनला. २०२३ मध्ये देवेंद्र यांची संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारी निवडणूक या पदावर बदली झाली. मात्र सारिकाचे वागणे आणखीनच विचित्र झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घरी आल्यानंतर शिवीगाळ
केंब्रीज येथील प्रकारानंतर कटके प्रचंड घाबरले. घरी आल्यानंतर सारिकाला विचारणा केली तेव्हा तिने पुन्हा जातीवाचक शिवीगाळ केली. तू कलेक्टर जरी असलास तरी खालच्या जातीचाच आहेत, असे बोलून अपमान केला. नखाने ओरबाडले. आम्ही तुला सोडणार नाहीत, काय व्हायचे ते होऊ दे, रक्तपात झाला तरी चालेल, अशा धमक्या दिल्या. सकाळी ती घरातील दागिने, पैसे घेऊन कारने माहेरी निघून गेली. चुकून लहान मुलाचा मोबाईल सोबत नेला.
खाण्यातून दिली वनस्पती
सारिका माहेरी निघून गेली, पण तिचा मोबाईल घरीच राहिला. कटके यांनी तपासले तेव्हा त्यात अनेक धक्कादायक फोटो, रेकॉर्डिंग आढळून आल्या. आरोपी सारिका, उबाळे, सारिकाची आई सुवर्णाबाई, भाऊ आतिश, मोलकरीण छायाबाई, संगीताबाई या सर्वांनी कट रचून कटके यांच्यावर अघोरी विद्येचे प्रयोग केले. त्यांना जेवणातून विषबाधा करून मारण्याचा कट रचला. गादीखाली काळे झालेले लिंबू, सुई टोचलेली बाहुली, फुलदाणीत बिबे, स्मशानातील राख, कोळसा, लवंगांची माळ, शेंदूर असे साहित्य दिसून आले. दररोज खाण्यातून कटके यांना विचित्र वनस्पती देत होते तीही किचनमध्ये आढळून आली.
वडीगोद्रीत हॉटेलवर प्लानिंग
भांडण करून गेलेली सारिका ९ मार्च रोजी पुन्हा परत आली. ती पुन्हा माहेरी जाताना रात्री दहा ते साडेअकरा वाजेदरम्यान वडीगोद्री येथील एका हॉटेलजवळ थांबली होती, हे जीपीएसवरून कटके यांना समजले. दुसऱ्या दिवशी त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही पाहिले असता सारिका तीन संशयित इसमांना भेटल्याचे समजले. सारिका, विनोद उबाळे, आतिष देशमुख, सुवर्णाबाई देशमुख हे कटके यांना जिवे मारण्याचा कट रचत असल्याचा संशय आहे. विनोद हा अघोरी विद्येचा उपासक असल्याचे मोबाईलमधील रेकॉर्डिंगवरून समोर आले आहे. त्याच्याकडे पिस्तूल, तलवारीही असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील करीत आहेत.
कटकेंवर रोखले पिस्तूल
कटके यांची कार (एमएच-२१-एएक्स - ०१०५) सारिका वापरते, पण सुरक्षेसाठी कारला त्यांनी जीपीएस लावले होते. सारिका नियमित रस्त्याने न जाता वेगळ्या मागनि जात असल्याने त्यांनी ३ मार्चला कारच्या लोकेशनवर गेले. रात्री साडेआठ वाजता केंम्ब्रिज चौकात सारिकाच्या कारजवळ दुसरी कार (एमएच २१-बीयू ८१११) उभी होती. ती कार विनोद उबाळे वापरत असल्याचे कटके यांना माहिती होते. तिथे देवेंद्र यांनी विचारणा करताच उबाळेने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्यावर थेट पिस्तूल रोखून आडवा आलास तर उडवून टाकील, अशी धमकी दिली होती.
Social Plugin