Hot Posts

6/recent/ticker-posts

Swachh survekshan | भाजीमंडई नव्हे वाहतुकीची कोंडी! उपाययोजना कधी? सर्वेक्षण पथकाचे लक्ष जाईल का?

राष्ट्रीय महामार्गावर 'ट्रॅफिक' जाम


वैजापूर: विक्रेत्यांच्या सोयीसाठी येवला महामार्गावर नगरपालिकेने करोडो रूपयांची नवी मंडई उभारली. परंतु विक्रीसाठी ना सोयीचे गाळे उभारले,ना दगडी ओटे, ना पाण्याची सोय,ना स्वच्छतागृहे. तसेच वाहनतळाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.त्यामुळे येथील अधिकृत आणि अनधिकृत मंडईतील विक्रेते रस्त्यावरच बसून भाजी विक्री करण्याला प्राधान्य देताना दिसतात.यामुळे महामार्गावर प्रचंड गर्दी होऊन अपघातही होत आहेत. ग्राहक भाजी खरेदी करताना दुचाकी आणि चारचाकीतून खाली न उतरताच भाजी खरेदी करत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होते. ट्रॅफिकमध्ये वाहनांची घासाघासी झाल्यास वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. यामुळे मारामारीचेही प्रसंग घडतात. याकडे पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन आदींकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. जे सर्वसामान्य नागरिकांना दिसते ते पोलीस आणि प्रशासन यांना कसे दिसत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. 

कोंडीवर ‘उपाय’ कधी ?

नाशिक-संभाजीनगर महामार्गावर भरणाऱ्या मंडई परिसरात वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. विशेष करून सोमवारी आठवडी बाजार दिवशी या मार्गावरील वाहतूक हमखास ठप्प होते परिणामी वाहनधारकांना कसरत करावी लागते. वारंवार होणारी ही कोंडी टाळण्यासाठी तात्पुरत्या नियंत्रणाऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता जुनी मंडई सर्वांच्या सोयीनुसार असल्याने पालिकेने त्याला विकसित करावे हाच एक पर्याय आहे.कारण नवी मंडई महामार्गाला लागून आहे.तसेच बहुतांशी शाळा, महाविद्यालये, बस स्थानक तसेच बाजारपेठ आहे. यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांना येवला महामार्गवर दिवसभरात अनेकदा ओलांडावा लागतो. त्यांमुळे लहान मोठे वाहनधारकांची मोठी गर्दी असते.त्यांमुळे जीव मुठीत धरून विद्यार्थी तसेच नागरिकांना हा महामार्ग ओलांडावा लागतो. 

महामार्गावर भाजी मंडईमुळे समस्या..!

विक्रेत्यांद्वारे अनधिकृतपणे रस्त्याचा ताबा, पदपथ आणि रस्त्यावरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्याने जावे लागते, अपघाताचा धोका, रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहतूक कोंडी, रस्त्याचे विद्रुपीकरण आणि बकालावस्था झाली आहे.

काय करायला हवे.?

वर्दळीच्या रस्त्यावर बसणाऱ्या भाजी-फळे विक्रेत्यांवर कारवाई गरजेची,विविध विक्रेत्यांचे पुनर्वसन करणे, रस्ते अतिक्रमणमुक्त करणे किंवा पुन्हा जूनी मंडई सुरु करणे.

पथकाने, इथं उभं राहवंच!

सध्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरील पथकाकडून शहरात पाहणी सुरू आहे. या पथकाने जरा राष्ट्रीय महामार्गावर तासभर उभे राहून भाजी मंडईत थांबल्यास त्यांना वाहनचालकांना या महामार्गावरून जाताना काय कसरत करावी लागते? याची किमान जाणीव होईल. याच ठिकाणी महामार्गावरील वाहतुकीच्या कोंडीमुळे ट्रकखाली चिरडून प्रतीक्षा चौधरी या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना साधारणतः दोन वर्षांपूर्वी घडली होती. त्यामुळे भाजी मंडई आणखी बळी घेण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत. सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना बळी जाऊनही जाग येत नसेल तर संवेदना बोथट झालेल्यांना आणखी काय म्हणावं? हाच प्रश्न आहे.