वैजापूर: स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरात केंद्रीय स्तरावरावरील पथक तळ ठोकून आहेत. 'कचऱ्याच्या' शहरात पथकाकडून शहरात विविध ठिकाणी पाहणी सुरू आहे. पथक येताच सुस्तावलेल्या पालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख रस्त्यांसह मुताऱ्यांची डागडुजी सुरू केली आहे. केवळ पुरस्कार पटकाविण्यासाठी पालिका प्रशासनाने ही मोहीम हाती घेऊन पथकाच्या डोळ्यात 'धुळफेक' सुरू केली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरील पथक सध्या वैजापूर शहरात तळ ठोकून आहेत. यात एका पुरुषांसह दोन महिलांचा समावेश आहे. या पथकाने शहरातील विविध भागांत जाऊन पालिकेच्या कामांची पाहणी केली. पालिकेने पथक येण्यापूर्वी ज्या मार्गावरून हे पथक जाणार होते. ते रस्ते स्वच्छ केले. याशिवाय शहरातील बहुतांश स्वच्छतागृहांना 'अवकळा' आलेली असताना त्यांच्या दुरूस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेऊन डागडुजी सुरू केली आहे.
शहरात पालिकेची हातावर मोजण्याइतकीच स्वच्छतागृहे असून पाण्याअभावी त्यांची अवस्था 'बकाल' झाली आहे. परिणामी दुर्गंधीमुळे त्यात 'नाक' दाबून प्रवेश करावा लागतो. त्यातही विशेषतः महिलांसाठी मोजकेच स्वच्छतागृहे आहेत. स्वच्छता नसल्याने महिला तिकडे जाण्यास धजावत नाही. परिणामी महिलांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत केवळ सर्वेक्षण होणार आहे म्हणून पालिकेने शहरात 'स्वच्छता' सुरू केली आहे. असे चर्वितचर्वण सुरू झाले आहे.
एरवी स्वच्छतेचे 'धिंडवडे' निघालेले असताना पालिका एवढी 'तत्पर' कशी झाली? असा प्रश्नही आता नागरिकांना पडू लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय पथक शहरात अजून दोन दिवस शहरात पाहणी करणार असून पालिकेने काय व कोणते 'दिवे' लावले? याची शहानिशा करणार आहे.
Social Plugin