तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
सिल्लोड : येथील चिमुकलीच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून त्या चिमुकलीच्या बापानेच तिला पाच हजारांत विकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. साधारणतः तीन दिवसांपूर्वी दत्तक घेतलेल्या आईवडिलांनी ४ वर्षीय चिमुकलीला अगोदर चटके दिले अन् नंतर टणक वस्तूने डोक्यात मारहाण करून तिला संपविल्याची घटना घडली होती.
ज्याने पोटच्या ४ वर्षीय चिमुकलीला ५ हजारांत विकले, त्या नराधम, निष्ठुर पित्याला शनिवारी रात्री ९ वाजता सिल्लोड शहर पोलिसांनी जालना येथून अटक केली. त्याला रविवारी सिल्लोड न्यायातलयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच चिमुकलीची संपविणाऱ्या दोन आरोपींच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली.
अब्दुल नसीम अब्दुल कयूम (वय ४१, रा. जालना) असे चिमुकलीला विकणाऱ्या पित्याचे नाव आहे. या आरोपीने ४ वर्षीय आयातला आरोपी शेख फहीम शेख अयूब (वय ३५), फौजिया शेख फहीम (वय २७ रा. सिल्लोड) याला पाच हजारांत विकले होते. परंतु कोणत्या आधारे या दोन आरोपींनी मुलीला दत्तक घेतले, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी अब्दुल नसीम याला ताब्यात घेतले आहे. त्याला रविवारी सिल्लोड न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली. तसेच सदर दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी संपल्यामुळे तपास बाकी असल्याने त्यांच्या पोलिस कोठडीत रविवारी पुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. टी. आढायके यांनी दोन दिवसांची वाढ केली आहे.
चित्र अजूनही अस्पष्ट
चार वर्षीय मुलीला 'संपवून' टाकल्यानंतर दोन आरोपी तीन दिवसांपासून पोलिस कोठडीत आहे. हा कट कशासाठी रचला गेला? हे पोलिसांना अद्याप उघड करता आले नाही. केवळ तपास सुरू आहे, इतकीच माहिती पोलिस देत आहेत. त्यामुळे या घटनेचे गुढ वाढले आहे. केवळ ५ हजार रुपयांमध्ये ४ वर्षीय चिमुकलीला विकणाऱ्या निष्ठुर पित्याला पोलिसांनी अटक केल्याने नवी माहिती समोर येईल. या घटनेबद्दल नागिरकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळेच घटना उघडकीस आल्याच्या दिवशी सिल्लोड शहर ठाण्यासमोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
केवळ कागदावर केली लिखापडी
ज्या चिमुकलीला विकण्यात आले, त्याचे दत्तकपत्रक रीतसर झालेले नाही. अब्दुल नसीम याने पाच हजार रुपयांत तिला विकले होते. एका साध्या कागदावर तिचा सांभाळ माझ्याकडून होत नसल्याने तुम्ही सांभाळ करावा, असा मजकूर लिहिला आहे. यामुळे या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढू शकतात? हे तपासात निष्पन्न होईल, असे पोलिसांनी सांगितले. मुलीला संपवून टाकल्यानंतर दोन आरोपी तीन दिवसांपासून पोलिस कोठडीत आहेत.
Social Plugin