पहिल्यांदा जात दूर ठेवा
राज्यात सध्या बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Massajog Sarpanch Santosh Deshmukh) प्रकरण चांगलेच गाजत असून या प्रकरणामुळे राजकीय तख्तासह अख्ख्ये राज्य ढवळून निघाले आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. या घटनेच्या अनुषंगाने अभिनेता किरण माने ( Actor kiran Mane Post on Facebook) यांनी भावनिक साद घालणारी पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. ती सध्या चांगलीच व्हायरल (Viral)होत आहे. या पोस्टरवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स झडत आहेत.
काय म्हणाले किरण माने पोस्टमध्ये?
बहुजनांनो, संतोष देशमुखला न्याय मिळवूनच द्यायचा असेल तर पहिल्यांदा ‘जात’ दूर ठेवा. मिडीयामधून अचानक संतोषच्या मृत्यूचे व्हायरल झालेले फोटोज हे अनाजीपंती कपट असू शकतं. बळी पडू नका. आपण जातीजातीत लढलो तर जुल्मी सत्तेचा फास आणखी आवळला जाईल ! कमकुवत पडत चाललेल्या कोरटकरी, सोलापूरकरी गिधाडांना बळ देण्यासाठी आपल्यात फुट पाडण्याचा कट असू शकतो.
एवढंच लक्षात ठेऊया की खून झालेला एक तुमच्या-माझ्यासारखा ‘माणूस’ होता… आणि मारेकरी माजोरड्या सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असणारे आहेत ! बास. वर्तमानात आपल्या भवताली याच दोन जाती आहेत. ‘सामान्य माणूस विरूद्ध सत्तेतले नराधम’… याच दोन जातीत सध्याचा संघर्ष सुरू आहे, हे मेंदूत कोरून घ्या.
‘मेलेला मराठा’ विरुद्ध ‘मारणारे वंजारी’ अशी कळ ठरवून लावली जात आहे… गुन्हेगारांच्या म्होरक्याला वाचवण्यासाठीचं ते कारस्थान आहे. एक सत्य समजून घ्या की याच मारेकरी नराधमांनी याच बीडमध्ये अनेक वंजाऱ्यांचाही बळी घेतला आहे ! म्हणजेच ते जातीच्या नाही, तर सत्तेच्या कैफात धुंद आहेत. या खुन्यांपासून ते कोरटकरांपर्यंत सगळे एका माळेतले मणी आहेत.
… त्यामुळं संतोष देशमुख प्रकरणात बोलताना ‘मराठा-वंजारी’ अशा जातीवरून कमेंट करू नका. फक्त ज्या सत्ताधाऱ्यांच्या बळावर त्यांनी हे निर्घृण कृत्य केलं त्या सत्ताधाऱ्यांना टारगेट करा.
बीड हे अत्यंत प्राचीन समृद्ध वारसा असलेलं ऐतिहासिक गांव आहे. त्याला हिणवण्यासाठी बिहारची उपमा देऊ नका. खुद्द महात्मा गांधींनी सत्याग्रहात संपूर्ण भारतातून जे पहिले सहा सत्याग्रही निवडले त्यात बीडचे हिरालाल सुखलालजी कोटेचा होते ! पानिपतात हरल्यानंतर निजामशाहीला पराभूत करून मराठ्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य आलं ते याच भूमीत. याच बीडमध्ये शंभर वर्षांपूर्वी अत्यंत दानशूर असलेल्या धोंडोजी किसन यांनी मुस्लिम बांधवांसाठी स्वखर्चानं मशीद बांधून दिली होती ! तो परिसर आजही धोंडीपुरा या नावानं ओळखला जातो.
अशा बीडला गुन्हेगारीचा कलंक लागणं हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. बीड हा महाराष्ट्राचा अभिमान होता. पुढे रहावा असे वाटत असेल तर जातपात बाजूला ठेवा. संतोष देशमुख प्रकरणात कोण आहेत, त्यांना कुणाचा वरदहस्त आहे हे जगजाहीर आहे. त्या सगळ्यांना अटक होऊन शिक्षा झाली पाहिजे यावर जोर द्या !
Social Plugin