लवकरच देणार पदस्थापना
वैजापूर येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्गंत अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) व मदतनीस (Helper ) पदाच्या एकूण १९४ जागांच्या भरतीसाठी एकूण ११४० अर्ज प्राप्त झाले आहे. दरम्यान ही भरती प्रक्रिया पात्रतेनुसार होणार असून लवकरच सेविकांसह मदतनिसांना पदस्थापना देण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तालुक्यातील एकूण १८ अंगणवाडी सेविका व १६६ अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याची शेवटच्या तारखेपर्यँत म्हणजेच २५ फेब्रुवारीपर्यंत येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे अंगणवाडी सेविका पदासाठी १६९ तर मदतनीस पदासाठी ९७१ असे एकूण ११४० अर्ज प्राप्त झाले आहे. ही भरतीप्रक्रिया पात्रतेनुसार (मेरिट) होणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण आवश्यक आहे. यामध्ये शैक्षणिक आर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण उमेदवाराला ६० गुण देण्यात येणार आहे. याशिवाय पदवीधरांना १० गुण, पदव्युत्तर ४ डीएड, बीएड प्रत्येकी २ गुण, एमएस्सी आयटी २ गुण, अनुसूचित जाती - जमाती ३ गुण, विधवा/ परित्यक्ता १० गुण, अनुभवी उमेदवारांना ५ गुण असे एकूण ४० गुण देण्यात येणार आहे.
उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर १० दिवसांच्या आत आक्षेप नोंदविता येणार आहे. ज्या गावांत ५ पेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या गावांत फेरप्रगटन देण्यात येणार आहे. जागा भरतीचे अधिकार एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना असून अन्य तालुक्यातील एकात्मिक बालविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांची पडताळणी समिती निवडीवर शिक्कामोर्तब करणार आहे. साधारणतः एप्रिल महिन्यात पात्र उमेदवारांना पदस्थापना मिळण्याची शक्यता आहे.
वैजापूर तालुक्यात १९४ अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. आमच्या कार्यालयाकडे दोन्ही पदांसाठी एकूण ११४० अर्ज प्राप्त झाले आहेत. बहुतांश अर्जांची स्क्रुटनी झाली असून साधारणतः एप्रिल महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल.
- संतोष जाधव, प्रभारी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, वैजापूर
Social Plugin