सिल्लोड: दत्तक घेतलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीचा तिच्या आई- वडिलांनीच अंगावर चटके देऊन डोक्यात मारून तिला संपविल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री ३ वाजता सिल्लोड शहरात उघडकीस आली.
आयात शेख फहिम (४ वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे तर शेख फहिम शेख अयुब, फौजिया शेख फहिम (रा. अजिंठा ह. मु. मोगलपूरा सिल्लोड) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अजिंठा येथील रहिवासी व ह. मु. सिल्लोड शहरातील मोगलपुरा भागात राहणाऱ्या शेख फहिम शेख अयुब, फौजिया शेख फहिम यांना चार मुले असल्याने त्यांनी मुलगी हवी होती म्हणून सहा महिन्यांअगोदर जालना येथील रहिवासी शेख नसीम अब्दुल कय्युम यांच्याकडून आयात शेख या मुलीला दत्तक घेतले होते.
मात्र बुधवार रोजी रात्री पती-पत्नीने संगनमत करून आयातला अंगावर चटके देऊन व डोक्यात टणक वस्तू मारून तिला संपविले. आरोपींनी मुलीला का संपविले? याचा मात्र अद्याप उलगडा झाला नाही. परंतु असे असले तरी या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी मुंडे करीत आहे. दरम्यान या घटनेने शहरात खळबळ उडाली असून निर्दयी मातापित्यांनी हे कृत्य कशासाठी केले? याचा पोलिस शोध घेत आहे.
Social Plugin