छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील ओल्या पार्टीचे प्रकरण दोघांच्या अंगलट आले आहे. न्यायदान कक्षातच दारूची पार्टी केल्याच्या प्रकरणाची राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. दारूची पार्टी करणारे लिपिक दिलीप केणेकर व शिपाई अशोक ओव्हळ यांना आयोगाने तात्काळ निलंबित केले. या कारवाईमुळे चाकरमान्यांनामध्ये धडकी भरली आहे.
आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी चक्क न्यायदान कक्षातच दारूची ओली पार्टी केल्याचे प्रकरण एका व्हिडिओच्या माध्यमातून उजेडात आले होते. आयोगाचे तीन सदस्य जिथे बसून न्यायदान करतात, त्याच कक्षात ही पार्टी रंगली होती. आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून अडवणूक झालेले व्यावसायिक सतीश राणे यांनी व्हिडिओ चित्रीकरणाच्या पुराव्यासह हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. त्याची दखल घेत राज्य ग्राहक निवारण आयोगाने ही पार्टी करणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.
दरम्यान, ओल्या पार्टीचे पुरावे गोळा करणारे व्यावसायिक सतीश राणे यांनी आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर खाबुगिरी व अडवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. ज्यांच्याविरुध्द खटला दाखल आहे किंवा ज्याने खटला दाखल केला आहे. असे लोक हेरून हे कर्मचारी पैसे उकळतात. दारूच्या पार्ट्या घेतात, असे राणे यांनी म्हटले आहे. आयोगाने २०२२ साली एका प्रकरणात माझ्याविरुद्ध निकाल दिला होता. त्या प्रकरणाची माझ्यापर्यंतच कोणतीही नोटीसच आलेली नव्हती. तरी मी १७ लाख रुपये भरावेत, असा एकतर्फी निकाल देण्यात आला. प्रकरणाची संचिका मिळावी यासाठी मी अर्ज केला. तेव्हा संचिकेसाठी माझ्याकडून पैसे घेण्यात आले. तसेच पुढे एका कर्मचाऱ्याने माझ्याकडून शौचालयाचे दुरुस्तीचे काम करून घेतले, असा आरोपही राणे यांनी केला आहे.
लगेचच केला अहवाल तयार
न्यायदान कक्षेतील दारू पार्टीचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा शिल्पा डोल्हारकर यांनी आपला अहवाल तयार केला. कार्यालयातील लिपिक दिलीप केणेकर व शिपाई अशोक ओव्हळ हे दोघे न्यायदान कक्षात दारू पित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावरून या दोघांवर कारवाई करावी, असा प्रस्ताव अध्यक्षा डोल्हारकर यांनी राज्य आयोगाकडे बुधवारी सकाळी सादर केला. त्यावर लगेचच दोन्ही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश येऊन धडकले.
किमान एवढे तरी भान ठेवा..!
दरम्यान सरकारी कार्यालयातच जर अशा दारू पार्ट्या होऊन दारूचे ग्लास रिचवले जात असतील. सामान्यांकडून काय अपेक्षा करायची? असा प्रश्न उपस्थित होतो. निर्ढावलेल्या कर्मचाऱ्यांना किमान एवढे तरी भान असायला हवे की, हे न्यायदान कक्ष असून तिथेच प्याल्यावर-प्याले रिचवणे कितपत योग्य आहे?
Social Plugin