Hot Posts

6/recent/ticker-posts

Vijapur Politics | तब्बल ५६ वर्षांनंतर वैजापूरला मानाचे पान! मुख्य प्रतोद आमदार रमेश बोरनारे यांना मंत्रिपदाचा दर्जा

 


वैजापूर | सत्यार्थी नेटवर्क 

राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या मुख्य प्रतोदांना मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. या निर्णयानुसार शिवसेनेचे मुख्य प्रतोद (Main pratod) तथा वैजापूर मतदारसंघाचे आमदार प्रा. रमेश बोरनारे (MlA Ramesh Bornare ) यांनाही मंत्रीपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या निधनानंतर तब्बल ५६ वर्षांनंतर वैजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीला हे मानाचे पान मिळाले असून यामुळे मतदारसंघात आनंद व्यक्त होत आहे. एकीकडे नुकत्याच पार पडलेल्या वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला पिछेहाट सहन करावी लागली असतानाच, दुसरीकडे बोरनारे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याने शिवसेना गोटात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 


नगरपालिका निवडणुकीतील पराभवामुळे बोरनारे समर्थकांमध्ये काहीशी निराशा पसरली होती. विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांचा झालेला पराभव हा त्यांच्या दृष्टीने जिव्हारी लागणारा ठरला. ही निवडणूक आमदार बोरनारे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. गेल्या सहा वर्षांत वैजापूर शहर व परिसरात झालेल्या विविध विकासकामांच्या जोरावर विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होता. मात्र भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी नगराध्यक्ष पदासह १५ नगरसेवकांच्या जागा जिंकत नगरपालिकेवर स्पष्ट बहुमत मिळवले. या पराभवानंतर शिवसेनेच्या गोटातून ‘घरच्या भेदींमुळेच पराभव झाला’ असा आरोप केला जात आहे. तथापि, आता या निकालावर फारसा ऊहापोह करून उपयोग नाही, अशी भावना पक्षांतर्गत व्यक्त होत आहे. ‘परीक्षा झाल्यानंतर प्रश्नपत्रिका आठवून उपयोग नसतो’, त्याप्रमाणे ‘जे झाले ते गंगेला मिळाले’, हे विसरून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेतृत्वाला संघटनात्मक पातळीवर आत्मपरीक्षण करून ‘आपले कोण आणि घरभेदी कोण’ याचा शोध घेत नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. दरम्यान, मुख्य प्रतोदांना मंत्रीपदाचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुखद धक्का बसला आहे. बोरनारे हे २०१९ पासून वैजापूर मतदारसंघात सलग विजयी होत असून, त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर विकासनिधी खेचून आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत. वैजापूर मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी मिळवून देणाऱ्या आमदारांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

मुख्य प्रतोदाची भूमिका काय असते?

विधानमंडळात पक्षशिस्त राखण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मुख्य प्रतोदावर असते. पक्षाच्या आमदारांनी किंवा खासदारांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेनुसार मतदान करावे, यासाठी तो ‘व्हीप’ जारी करतो. महत्त्वाच्या विधेयकांवर, विश्वासदर्शक अथवा अविश्वास ठरावांवर सदस्यांची उपस्थिती आणि मतदान व्यवस्थापन ही मुख्य प्रतोदाची जबाबदारी असते. तसेच पक्ष नेतृत्व, आमदार आणि सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती यांच्यात समन्वय साधण्याची भूमिकाही तो बजावतो. व्हीपचे उल्लंघन झाल्यास दल-बदल कायद्यानुसार कारवाईचा इशाराही मुख्य प्रतोद देऊ शकतो.

पुढील राजकीय दिशा काय?

मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याने आमदार रमेश बोरनारे यांचा पक्षातील आणि शासनातील प्रभाव वाढणार आहे. या दर्जाचा उपयोग ते पक्षसंघटना मजबूत करण्यासोबतच वैजापूर मतदारसंघाच्या विकासासाठी कितपत करून घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नगरपालिका निवडणुकीतील पराभवातून सावरण्यासाठी हा निर्णय शिवसेनेसाठी संजीवनी ठरतो का? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

स्व. विनायकराव पाटील यांच्यानंतर बोरनारे !

वैजापूर तालुक्यात आतापर्यंत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी सहकारमंत्री स्व. विनायकराव पाटील यांनाच मंत्रीपदाचा मान मिळाला होता. त्या खालोखाल आता आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याने तालुक्याच्या राजकीय इतिहासात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.