विरोधकांनाही सणसणीत चपराक
वैजापूर: गेल्या काही दिवसांपासून स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) गटबाजीचे 'ग्रहण' लागले असून चक्क पक्षनिरीक्षकांसमोरच गटबाजीचे प्रदर्शन झाल्याचा प्रकार समोर आला होता. या बैठकीत पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदावरून वादंग उठले होते. या पदासाठी वेगवेगळी नावे समोर आली. परंतु या खेचाखेचीत ती नावे बाजूला सारून तिसऱ्याच्याच 'गळ्यात' या पदाची माळ पडली. त्यामुळे सर्वांचीच अवस्था 'जोर झटका धीरे से लगे' अशी झाली.
साधारणतः गेल्या आठवड्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress party Ajit Pawar) वैजापूर तालुका पक्षनिरीक्षक संजय जाधव यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची वैजापूर येथे बैठक घेतली. बैठकीत त्यांना गटबाजीचे प्रदर्शन झाले होते. अगोदर जाधव यांना शहरातील ठक्कर बाजार व त्यानंतर मुरारी पार्क अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी बैठक घेण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता.
शहरातील ठक्कर बाजारमध्ये पक्षाच्या कार्यालयात व मुरारी पार्क परिसरात आयोजित या बैठकींमध्ये पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापसातील मतभेद उघडपणे मांडले. पक्षातील ही अंतर्गत खदखद पाहून जाधव यांनी खेद व्यक्त केला केला. या बैठकीत तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून चर्चा तापली. विद्यमान तालुकाध्यक्ष विजय पवार यांना कायम ठेवण्याची मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली तर दुसऱ्या गटाने विशाल शेळके यांच्या नावाला पसंती दर्शवली.
दरम्यान शहरात झालेल्या पक्षाच्या दोन बैठका व त्यामधील चर्चेमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून कार्यकर्त्यांमधील मतभेद एवढे टोकाला गेले की, पक्षाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान या बैठकीच्या काही दिवसांनंतर या दोन्हीही गटांच्या बैठकीत तालुका अध्यक्षपदासाठी समोर आलेली नावे बाजूला सारून तालुकाध्यक्ष पदावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंकज ठोंबरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन त्यांची वर्णी लागली. त्यामुळे दोन्हीही गटांतील पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच तोंडघशी पडले. परंतु असे असले तरी गटबाजी संपुष्टात आली. असं म्हणता येणार नाही.
परंतु पंकज ठोंबरे यांच्या रुपाने पक्षाला नव्या दमाचा तालुकाध्यक्ष मिळाला. या खेचाखेचीत त्यांनी बाजी मारून पक्षातीलच विरोधकांना सणसणीत चपराक दिली आहे. वास्तविक पाहता तालुकाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची कोणतीही चर्चा नसताना ही 'माळ' त्यांच्या गळ्यात पडून अचानक 'लाॅटरी' लागली. असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. परंतु दुसरीकडे ठोंबरेंची सक्रियता, पक्षाचे संघटन कौशल्य व राजकीय वारसा पाहता या जमेच्या बाजू आणि त्यांची 'बलस्थाने' आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. असं म्हणणं जास्त संयुक्तिक होईल. याचा अर्थ अन्य कार्यकर्ते योग्यतेचे नव्हते किंवा नाही. असा होत नाही.
खांदेपालट पक्षासाठी 'बुस्टर डोस'
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवरील काम व उपलब्धता, वजन, सक्रियता व गटस् बघून ही जबाबदारी ठोंबरेंना सोपवली. येणाऱ्या काळात ठोंबरे या संधीचे सोने करतील. अशी भावना त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वरिष्ठांनी केलेली ही 'खांदेपालट' पक्षासाठी 'बुस्टर डोस' ठरू शकतो. ठोंबरे या पदासह कार्यकर्त्यांना कितपत न्याय देतात? हे मात्र आगामी काळात समजणार आहे.
Social Plugin