Hot Posts

6/recent/ticker-posts

Vijapur Crime News | सीसीटीव्हीचे वायर तोडले.. मग दगडाने ठेचून महिला कीर्तनकाराची हत्या; काय आहे नेमकी घटना?

 दगड डोक्यात घातले; मंदिरातून दानपेटी चोरीला 

वैजापूर: डोक्यात दगड घालून एका ५० वर्षीय महिला कीर्तनकाराची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना २७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वैजापूर-गंगापूर महामार्गावरील तालुक्यातील चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात घडली. दरम्यान या महिलेच्या डोक्यात दोन दगड घालून निर्घृणपणे हा खून करण्यात आला. या घटनेचा उद्देश जरी समोर आला नसला तरी मंदिरातील दानपेटी चोरी झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांच्या निदर्शनास आल्यामुळे सर्व बाजूनी तपास करत आहेत.

ह.भ.प. संगीता पवार (वय ५० रा. चिंचडगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगीता पवार या मागील दोन महिन्यांपासून तालुक्यातील चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात  वास्तव्यास होत्या. त्या अविवाहित असून, त्यांनी संन्यास स्वीकारला होता. परिसरात त्या कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात होत्या व नियमितपणे कीर्तनाचे कार्यक्रम करीत असत. 

अखेर 'त्या' पतसंस्थेच्या संचालकांविरुध्द गुन्हा; ठेवीदारांना पावणेसहा कोटींचा गंडा

दररोज रात्री त्या आश्रमातील आपल्या खोलीतच झोपत होत्या. परंतु शुक्रवारी रात्री त्या खोलीबाहेर झोपल्याची  अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास काही अज्ञातांनी आश्रमाचे प्रवेशद्वार व कुलूप तोडून आत प्रवेश केला. या व्यक्तींनी संगीता पवार यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांची हत्या केली.

ग्रामसेवकास मारहाण करणे भोवले; 'त्या' दोघांना सश्रम कारावास

 दरम्यान शनिवारी सकाळी मोहटादेवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले असता त्यांना आश्रमाचे गेट व कुलूप तोडलेले असल्याचे निदर्शनास आले. आत प्रवेश केल्यानंतर त्यांना संगीता पवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या व मंदिराची दानपेटी चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना व पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

हेही वाचा: पालिका अधिकारी-कर्मचारी व्हाॅटस्अॅप चॅट लिकेज्; मोठा 'मलिदा' हडफण्याचा डाव, काय झाला संवाद?

माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेत तात्काळ घटनेचा पंचनामा केला. संगीता पवार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सीसीटीव्हीचे वायर तोडले, हार्ड डिस्क सापडली

दरम्यान मारेकऱ्यांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर कापल्याचे पोलिस तपासात समोर आले असून घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना हार्डडिस्क सापडली आहे. पोलिसांना प्रथमदर्शनी मंदिरातून दानपेटी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दानपेटी चोरी करताना त्यांनी बघितल्यामुळे ही हत्या करण्यात आली की? अन्य काही घटनेची किनार आहे? या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. 

आमदारांची घटनास्थळी भेट 

घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा आमदार रमेश बोरनारे यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा बारकाईने तपास केला असता, मंदिराची दानपेटी चोरीला गेल्याचे आढळून आले. या घटनेमुळे चिंचडगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

१७ दिवसांत तीन खून 

१२ जूनपासून तर आजपर्यंत तालुक्यात तीन खून झाले. १२ जून रोजी खंडाळ्यात २३ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून तर राहेगावात ५३ वर्षीय अंगणवाडी सेविकेची पतीनेच कोयत्याने खून केला. 

जमिनीचा होता वाद

दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी संगीता पवार यांनी वीरगाव पोलिस ठाण्यात चार जणांविरुध्द तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. जमिनीच्या वादातून ही तक्रार देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.