Hot Posts

6/recent/ticker-posts

Patsanstha Fraud | अखेर 'त्या' पतसंस्थेच्या संचालकांविरूद्ध गुन्हा; ठेवीदारांना पावणेसहा कोटींचा गंडा, काय आहे प्रकरण?

 वैजापूर शहरात होती शाखा 

वैजापूर: ठेवीदारांची ५ कोटी ८३ लाख ६६ हजार ५७२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या १५ सदस्यांच्या संचालक मंडळाविरूद्ध  वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीमध्ये पतसंस्थेच्या अध्यक्षा ,उपाध्यक्षा, सचिव, मुख्याधिकारी, व्यवस्थापक व संचालीकांचा समावेश आहे.

श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात शाखा आहेत.त्यात छत्रपती संभाजीनगर शहरात चार, वैजापूर,लासुरस्टेशन व शिऊर येथे प्रत्येकी एक शाखा आहे. वैजापूर शहरातील म्हसोबा चौकात पतसंस्थेची शाखा सुरू होती. 

हेही वाचा: पालिका अधिकारी-कर्मचारी व्हाॅटस्अॅप चॅट लिकेज् ;मोठा 'मलिदा' हडफण्याचा डाव, काय झाला संवाद?

ही शाखा साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी अचानक बंद झाली होती. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले होते. त्यामुळे काही ठेवीदारांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली होती. पोलिसांनी पैसे बुडालेल्या सर्व ठेवीदारांचे जबाब घेऊन माहीती पोलिस अधीक्षकांना सादर केली होती. या पतसंस्थेने शहरात तीन पिग्मी एजंटाची नेमणूक केली होती. कृष्णा धुळे, सौरभ अटल व राहुल मतसागर यांनी शहरातील ग्राहकांकडून पैसे घेऊन ते पतसंस्थेत भरले होते. तसेच १६५ ठेवीदारांनी पतसंस्थेत मुदत ठेवी ठेवल्या होत्या. ही रक्कम ५ कोटी ८३ लाख ६६ हजार ५७२ इतकी होती. अचानक पतसंस्था बंद पडल्याने सर्व ठेवीदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले. 

हेही वाचा: सीसीटीव्हीचे वायर तोडले..मग दगडाने ठेचून महिला कीर्तनकाराची हत्या; कशी घडली घटना?

अशी आहेत संचालकांची नावे

याप्रकरणी पिग्मी एजंट कृष्णा दिलीपराव धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या अध्यक्षा उषा गणेश मोरे, उपाध्यक्षा सुशीला राजेंद्र म्हस्के, सचिव गंगासागर आप्पासाहेब शेजवळ, मुख्याधिकारी गणेश रामहरी मोरे, व्यवस्थापक रुस्तुम दादासाहेब मतसागर, संचालिका कविता विष्णू सुरडकर,सविता रामकिसन म्हस्के, सुजाता सतीश शेरखाने, सविता गोकुळ मोरे, मंजुश्री दगडू काकडे, गीता चंद्रकांत चव्हाण, कल्पना नरसिंगग माळी, पुजा आदीनाथ नवले, पल्लवी किशोर आघाव, पार्वती गणेश रविवाले या १५ जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास छत्रपती संभाजीनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.