Hot Posts

6/recent/ticker-posts

Crime News | नीटला कमी गुण मिळाले; मुख्याध्यापक पित्याने मुलीला संपवले! काय आहे नेमकी घटना?

खुंट्याने केली बेदम मारहाण 


सांगली|सत्यार्थी नेटवर्क: राज्यातील सांगली जिल्ह्यात सर्वांना हादरून सोडणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे. नेलकरंजी गावात नीट (NEET) चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून एका मुख्याध्यापक वडिलांनी आपल्याच मुलीला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात पित्याला अटक करण्यात आली आहे.


साधना भोसले (Sadhana Bosle Sangli) असे मृत मुलीचे नाव आहे तर धोंडीराम भोसले असे मुख्याध्यापक मारेकरी पित्याचे नाव आहे. इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या साधनाचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. मात्र नीटच्या चाचणी परीक्षेत तिला अपेक्षित गुण मिळाले नाहीत. त्यामुळे तिचे वडील धोंडीराम भोसले हा स्थानिक खासगी शाळेत मुख्याध्यापक होता.

साधना दोन दिवसांपूर्वीच घरी आली होती. शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास तिला जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. विशेष म्हणजे तिच्या प्रकृतीची कोणतीही दखल न घेता दुसऱ्या दिवशी वडील धोंडीराम भोसले हा ‘योग दिन’ साजरा करण्यासाठी शाळेत गेला. तो घरी परतल्यावर  साधना त्याला बेशुद्ध अवस्थेत दिसल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. 

दरम्यान याप्रकरणी साधनाची आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपी वडील धोंडीराम भोसले याला रविवारी अटक करण्यात आली आहे.

अंतर्मुख करणारी घटना 

साधना ही अतिशय बुद्धिमान विद्यार्थिनी होती. दहावीमध्ये तिने 95 टक्के गुण मिळवले होते. पण एका चाचणी परीक्षेत अपेक्षेपेक्षा थोडे गुण कमी मिळाले, आणि त्यासाठी तिला तिच्या आयुष्याची किंमत मोजावी लागली. ही घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी आहे.

मूल्यांवरच प्रश्नचिन्ह 

प्रश्न विचारणारा काळा आरसा, शिक्षणाची गुणवत्ता, गुणांची चढाओढ आणि अपयश पचवण्याची क्षमता यावर समाज पुन्हा विचार करेल का? एका शिक्षण संस्थेचा प्रमुख असलेला व्यक्ती जर स्वतःच्या मुलीशी असे वागतो, तर शिक्षण क्षेत्राच्या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उभे राहते. या दुर्दैवी घटनेने सांगली जिल्ह्यासह राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

#Sadhana Bosle Sangli #Sangli Crime News