Hot Posts

6/recent/ticker-posts

Leopard attack | 'त्याने' तिला १०० फूट फरपटत नेले अन्..; काय आहे घटना?

 बिबट्याचा धुमाकूळ सुरूच!



वैजापूर: तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून पाठोपाठ एक - एकाचे बळी जात असताना दुसरीकडे वनविभाग सुस्तावलेल्या अवस्थेत आहे. पहाटेच्या सुमारास प्रातःविधीसाठी घराबाहेर पडलेल्या ६५ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून १०० मीटर फरफटत नेले. या घटनेत वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना १ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील  जिरी - लोढरा शिवारात सुमारास घडली.

 झुंबरबाई माणिकराव मांदडे (वय६५ रा.जिरी ता.वैजापूर ) असे बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की झुंबरबाई मांडदे या आपल्या सून - मुलांसह गट.क्र.२८ मधील शेतात वास्तव्यास होत्या. दरम्यान पहाटे प्रातःविधीसाठी घराबाहेर पडल्या असता बिबट्याने अचानक झडप घालून महिलेस जवळपास १०० मिटर फरफटत नेले. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्याने त्या मृत पावल्या. 

वैजापूर तालुक्यातील वळण शिवारात ३ वर्षीय मुलीवर हल्ला करून बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आठ दिवसातील याच परिसरातील दुसऱ्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

वारंवार हल्ल्याच्या घटना घडूनही वनविभाग सुस्त झोपेचे सोंग घेत असून बिबट्याला जेरबंद करण्यास अयशस्वी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. निष्पाप जिवांना आपला जीव गमवावा लागत आहे. डोंगरथडी भागात गेल्या काही महिन्यांत बिबट्याने हैदोस घातल्याने घटनांची मालिका सुरूच आहे. यामध्ये नागरिकांसह पाळीव जनावरे,पशुधन,लहान बालकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.

आमदार बोरनारेंची मध्यस्थी 

 वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नागरिकांनी अधिकारी कर्मचाऱ्यास चांगलेच फैलावर घेतले. जोपर्यंत बिबट्याला जेरबंद करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही. असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता. मात्र आमदार रमेश बोरनारे यांच्या मध्यस्थीने नागरीकांना समज देऊन शिऊर येथील आरोग्य उपकेंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. 

..तर  रास्तारोको करू

घटनेची मालिका थांबत नसल्याने शेतवस्तीवरील नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. प्रशासनाने दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास प्रशासनाच्या विरोधात परिसरातील नागरिकांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येईल. असा इशारा नागरिकांनी दिला आहे.