Hot Posts

6/recent/ticker-posts

Fraud | 'त्याने' कंपनीलाच लाखोंना गंडविले; हिशेबात आढळली तफावत

 वैजापूर पोलिस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा 


वैजापूर: येथील वैजापूर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या  मका खरेदी-विक्री केंद्रातून सुमारे ६ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या संचालकांनी दिलेल्या तक्रारीवरून बाळासाहेब बाबुराव गायकवाड (रा. नांदगाव, ता. वैजापूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

        याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट मंत्रालयाकडे नोंदणीकृत संस्था आहे. ही कंपनी वैजापूर परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करून त्यावर प्रक्रिया करते आणि बाजारभाव वाढल्यानंतर तो विकून नफा शेतकऱ्यांमध्ये वाटते. 
कंपनीने १० नोव्हेंबर २०२३ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत नांदगाव येथे मंगला बाळासाहेब गायकवाड यांच्या जागेवर विनामूल्य मका खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी लागणारे साहित्य, जसे की ताडपत्री, वजन काटा, आर्द्रता मशीन आणि इतर किरकोळ वस्तू, बाळासाहेब गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आल्या. ३१ डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत मका खरेदी करण्यात आली. 
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा चांदोडकर यांनी हिशेब तपासला असता धक्कादायक बाब समोर आली. रेकॉर्डनुसार २ लाख ५८ हजार ५२५ रुपयांचा माल शिल्लक असताना प्रत्यक्षात तो माल कंपनीकडे आढळला नाही.
 तसेच काळे मगर ट्रेडिंग कंपनीमार्फत मका खरेदी-विक्रीसाठी दिलेल्या ३ लाख ६९ हजार ८२६ रुपयांची थकबाकी दीपक नागे यांच्या ऑडिटमध्ये आढळली. याबाबत संचालक मंडळाने गायकवाड याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन केवळ ७० हजार रुपये जमा केले तर ७२ हजार ४८७ रुपयांचे साहित्यही कंपनीला परत केले नाही.