Hot Posts

6/recent/ticker-posts

Vaijapur Merchants Bank | बॅंकेवरील 'ते' आरोप वैयक्तिक सुडापोटीच; काय म्हणाले पत्रपरिषदेत चेअरमन?

 चौकशीला सामोरे जायला तयार 

वैजापूर मर्चंटस् को- ऑपरेटिव्ह बॅंकेबाबत तक्रारींच्या माध्यमातून करण्यात आलेले आरोप वैयक्तिक व राजकीय सुडापोटी करण्यात आले असून बॅंकेवर ठेवण्यात आलेला ठपका संचालक मंडळाला मान्य नाही. कुणीही चौकशी करा आम्ही सामोरे जायला तयार आहोत. असे बॅंकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती यांनी स्पष्ट केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भागिनाथ मगर यांनी वैजापूर मर्चंटस् को-ऑपरेटिव्ह बॅंकेत अर्थिक अनियमिततेसह अन्य मुद्द्यांवर तक्रार केली होती. या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले असून यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

 यासंदर्भात बॅंकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती यांनी संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. ते म्हणाले की, बॅंकेच्या व्यवहारात कोणतीही अनियमितता नसून लेखापरीक्षण अहवालात कोणत्याही त्रुटी नाही. सध्या संस्था चांगल्या स्थितीत असून केवळ संस्थेची बदनामी करण्यासाठी मगर यांनी शिंतोडे उडवले आहेत. बॅंकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत त्यांचा अर्ज अपात्र ठरविल्या गेल्याने त्याचा राग मनात धरून हे षडयंत्र रचले गेले. बॅंकेची निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा होती. परंतु सभासदांच्या विश्वासामुळे गेल्या २५ वर्षांत बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली नाही. हे आमचे यश आहे. चांगल्या स्थितीत असलेल्या संस्थेला बदनाम करण्याचा हा डाव आहे. परंतु तो सफल होणार. 

तक्रारींच्या अनुषंगाने चौकशीसाठी समिती गठीत केल्याचे मला समजले. परंतु याबाबत बॅंकेला कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही. कुणा एखाद्या अधिकाऱ्याला हाताशी धरून तक्रारी करणार असेल तर आम्हाला ते कदापि मान्य नाही. बॅंकेच्या व्यवहाराची चौकशी होणार असेल तर आम्ही सर्व संचालक सामोरे जायला तयार आहोत.परंतु या चौकशीतून क्लीन चिट मिळाली तर संबंधितांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकल्याशिवाय राहणार नाही. 

वैयक्तिक व राजकीय सुडापोटी कुणी जर बॅंकेची नाहक बदनामी करीत असेल कदापि माफ केले जाणार आहे. चौकशी होईपर्यंत आम्ही शांत बसू. परंतु चौकशीनंतर काय निर्णय घ्यायचा ते आज सांगणं योग्य होणार नाही. यावेळी व्हाईस चेअरमन उल्हास ठोंबरे, सावन राजपूत, अशोक कोठारी, अकील शेख, ॲड. प्रमोद जगताप, प्रशांत सदाफळ, प्रशांत त्रिभुवन आदी उपस्थित होते.

काय आहे प्रकरण?

 वैजापूर मर्चेंट्स को ऑप बँकेची विशेष लेखापरीक्षक, वर्ग २, सहकारी संस्था (फिरते पथक) यांच्या लेखापरीक्षण अहवालातील छाननी अहवालातील अभिप्रायानुसार नमूद मुद्द्यांबाबत लक्ष करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, जिल्हा उपनिबंधक यांची प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अपर निबंधक मिलिंद आकरे यांनी हे आदेश काढले. सदरील बँकेचे कामकाज महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, बँकेचे मंजूर उपविधी, शासन आणि आरबीआयने वेळोवेळी जारी केलेले आदेश यानुसार करणे बँक व्यवस्थापनावर बंधनकारक असते. मात्र भागीनाथ शहादराव मगर यांनी ६ जून २०२५ रोजी सदर बँकेच्या लेखापरीक्षण अहवालाचे छाननी अहवालातील गंभीर मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी तक्रार केली होती.