मारेकरी परप्रांतीयच!
वैजापूर: महिला कीर्तनकार संगीता पवार यांच्या परप्रांतीय मारेकऱ्यांना गजाआड करण्यात पोलिसांना तब्बल पाच दिवसांनंतर यश आले असून या दोघांनाही शिताफीने पकडले. यातील एकाला वैजापूर तालुक्यातील महालगाव येथून तर दुसऱ्याला राज्याच्या सीमावर्ती भागात पकडले.
![]() |
कीर्तनकार संगीता पवार यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी पकडले. |
संतोष उर्फ भायला जगन चौहान व ( रा.अंछली ता. सेंधवा जि. बडवाणी राज्य मध्यप्रदेश ह. मु. गाढेपिंपळगाव ता.वैजापूर) व अनिल उर्फ हाबडा नारायण विलाला (रा. अंछली ता. सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्यप्रदेश) अशी दोन्ही मारेकऱ्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री चिंचडगाव शिवारात सदगुरु नारायणगिरी आश्रम येथील मोहटादेवी माता मंदिर परिसरात महिला कीर्तनकार संगीता पवार यांची अज्ञातांनी डोक्यात दगड घालून हत्या केली होती. मारेकऱ्यांनी मंदिरातील दानपेटीसह व मूर्ती देखील चोरल्या होत्या. त्याचवेळी मारेकऱ्यांनी सीसीटीव्हीचे वायरही तोडले होते. ही घटना २७ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. २८ जून रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.
त्याला पोलिसांनी खुनाबद्दल चौकशी केली असता सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हा गुन्हा आपण अनिल उर्फ हाबडा नारायण विलाला याच्यासह केल्याची कबुली दिली. परंतु अनिल हा गावाकडे पळून गेल्याचे पोलिसांना समजले. लगेचच पोलिसांच्या एका पथकाने अनिल याला मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या शिरपूर येथून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात दोघा मारेकऱ्यांनी चोरीच्या उद्देशानेच हा गुन्हा केल्याची माहिती समोर आली.
पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सपोनि शंकर वाघमोडे (वीरगाव), स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सपोनि संतोष मिसळे, पवन इंगळे, सुधीर मोठे, वाल्मिक निकम, विठ्ठल डोके, शिवानंद बनगे, अशोक वाघ, गोपाळ पाटील, योगेश तरमाळे, जीवन घोलप, चालक संजय तांदळे, नीलेश कुडे, विजय ब्राम्हदे, गणेश पंडुरे आदींच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
परप्रांतीयांबाबत पोलिस यंत्रणा बेखबर
दरम्यान यानिमित्ताने पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांकडे परप्रांतीयांचा कोणताही आकडा उपलब्ध नाही. वैजापूर शहरासह तालुक्यात काम, मजुरीच्या निमित्ताने परप्रांतीय मोठ्या प्रमाणावर ठाण मांडून आहेत. वास्तविक पाहता जेथे ते राहतात, त्यांनी ही माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असताना ती माहिती दिली जात नाही. विशेषतः शेतीच्या कामासाठी मध्यप्रदेशातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात लोंढे येतात. याबाबत वैजापूरसह शिऊर व वीरगाव पोलिसांत कोणताही आकडा अथवा माहिती उपलब्ध नाही अन् पोलिसांनाही याच्याशी देणेघेणे नाही. ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली. पोलिसांची गोपनीय शाखा काय करते? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
#chatrapatisambhajinagar #chatrapatisabhajinagarsp #news #vaijapurcrimenews #sangitapawarmurdercase #marathinews #maharashtracrimenews
Social Plugin