Hot Posts

6/recent/ticker-posts

Kharif season. | १०६ टक्के पेरणी: वैजापूर तालुक्यात मक्याचे क्षेत्र वाढले दुपटीने

 कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती 

वैजापूर तालुक्यात यंदा मृग नक्षत्राच्या पावसाने बहुतांश ठिकाणी वेळेवर दमदार सलामी दिल्याने  तालुक्यात खरिपाची आतापर्यंत १०६.६९ टक्के इतक्या क्षेत्रावर पेरणी पार पडली आहेत. आगामी  दिवसात खरिपाच्या ११५ टक्क्यांपर्यँत पेरणी  पार पडेल. असा अंदाज कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात येत आहे. कृषी विभागाकडून खरिपाचा टक्का वाढल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान मागील वर्षांपेक्षा यंदा तालुक्यात मकाच्या पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे.

 वैजापूर तालुक्यात १ लाख ३६ हजार ७०४ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असून यापैकी १ लाख ४५ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी पार पडली असून आंतरपिकांचा देखील समावेश आहे. मागील वर्षी बहुतांश ठिकाणी  पावसाने लहरीपणा दाखवला होता. यामुळे  जवळपास काहीशा उशिराने खरिपाची पेरणी पार पडली होती. पावसानेही आपला लहरीपणा कायम राखत शासकीय दप्तरी कोरम पूर्ण केला. परंतु पावसाच्या लहरीपणाचा फटका पिकांना मोठ्या प्रमाणात बसला होता.

 दरम्यान मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाने तालुक्यात वेळेवर हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांसाठी आशादायक चित्र निर्माण झाले आहे.  जून अखेर तालुक्यात खरिपाच्या एकूण १०६ टक्के इतक्या क्षेत्रावर खरिपाची पेरणी पार पडली आहे.  यंदा तालुक्यात शेतकऱ्यांनी मका पेरणीला  सर्वाधिक प्राधान्य दिल्याने ८५ हजार ५६० हेक्टर इतक्या क्षेत्रावर मका तर त्याखालोखाल  ४५ हजार १९३ हेक्टर इतक्या क्षेत्रावर कपाशी पिकाची लागवड केली आहे.  दरम्यान सोयाबीन ३ हजार ५८१ हेक्टर, मूग ३ हजार ४३८ हेक्टर, भुईमूग २ हजार ५६३ हेक्टर, तूर २ हजार ४८१ हेक्टर, बाजरी २ हजार ६३ हेक्टर, उडीद १५० हेक्टर, ऊस ८२६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी पार पडली आहे. 

८६ हजार हेक्टरवर मका लागवड 

कपाशी लागवडीपासून ते वेचणी दरम्यान लागणारा खर्च व दराची घसरण पाहता यंदा शेतकऱ्यांनी  कपाशीपेक्षा मका लागवडीला प्राधान्य दिले आहे. दरवर्षी तालुक्यात सरासरी ६८ हजार क्षेत्रावर लागवड होणाऱ्या कपाशीचे क्षेत्र यंदा कमी झाले असून ४५ हजार १९३ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कपाशाची लागवड केली आहे तर दरवर्षी सरासरी ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणाऱ्या मका पिकाची यावर्षी ८५ हजार ५६० हेक्टर इतक्या क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.


यंदा खरिपाची ११५ ते १२० टक्क्यांपर्यंत क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे.ज्ञ कपाशीचे क्षेत्र कमी झाले असून मक्क्याच्या क्षेत्रात १७८ टक्के वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आत्तापासूनच काळजी घेतली पाहिजे.

- व्यंकट ठक्के, तालुका कृषी अधिकारी, वैजापूर